कॉंग्रेसचे माजी आमदार सानंदाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

अकोला - खोटी कागदपत्रे तयार करून सरकारी रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी व्यायाम मंदिर या संस्थेच्या जागेवर शासकीय निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिरास परत दिल्याच्या तक्रारीवरून कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह आणखी काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन जोशी यांनी शिवाजीनगर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार श्री शिवाजी व्यायाम मंदिराची जागा ही जागा सरकारी नसताना त्यावर बांधकामासाठी घेण्यात आलेल्या दानपत्रासाठी बेकायदा पद्धतीने शर्ती व अटी मंजूर करून अनुदान मिळविण्यात आले. या व्यायाम मंदिराच्या जागेवर सरकारी निधीतून बांधकाम करणे व बांधकामासह जागेचा ताबा श्री शिवाजी व्यायाम मंदिराला परत देण्यात आला. या तक्रारीवरून पोलिसांनी श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकूलचंद सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे, तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्यासह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.