दिवाळी - भाऊबीज योजनाही बारगळली; बचत गटांची निराशा

विवेक मेतकर
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

बचत गटांच्या महिलांना योजनेची माहितीच नाही, कर्मचारी संपाचा परिणाम 

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या दिवाळी-भाऊबीज भगिनी योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने महिला बचतगटांची निराशा झाली. याळात योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरल्याने या योजनेला राज्यभराप्रमाणे जिल्ह्यातूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेबद्दल माहितीच नसल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील बचतगटाच्या महिलांनी दिल्या. 

दिवाळसणाला खास महिलांनी तयार केलेल्या वस्तू व फराळाची विक्री करण्यासाठी बसस्थानक परिसरात एक स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला होता. यमाध्यमातून महिला बचतगटांना बसस्थानक परिसरात केवळ एक रुपयात स्वतंत्र दालन देण्यात येणार होते. परंतु, ही योजना महिला बचतगटांपर्यंत पोहोचलीच नसल्याने जिल्ह्यात सपशेल अपयशी ठरली. दिवाळीच्या दिवसांत महिलांनी तयार केलेल्या वस्तू व फराळाला ग्राहकांकडून विशेष मागणी राहते; परंतु बाजारातील प्रस्थापित व्यावसायिकमुळे महिला बचतगटांना आपल्या वस्तूंची विक्री करणे सहज शक्य होत नाही. अशा वेळी बसस्थानक परिसरात महिला बचतगटांना जागा उपलब्ध करून दिल्यास सहज ग्राहक उपलब्ध होईल, अशी महामंडळाची धारणा होती. दरम्यान, विभागीय कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक प्रशासन या योजनेचा प्रचार करण्यात कमी पडल्याने विभागीय कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

संपाचा परिणाम 
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटीचे कर्मचारी संपावर जाणार असल्याचे लोण राज्यभरात पसरले होते. कर्मचारी संपात व्यस्त असल्याने कदाचित या योजनेबद्दल ते माहिती देऊ शकले नाही, असा टोला प्रवाशांनी लगावला.   

Web Title: akola news diwali bhaubij scheme bachatgats disappointed