विद्यार्थी दशेतच घडणार जागरुक मतदार!

प्रवीण खेते
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

निवडणूक आयाेगाचा उपक्रम; राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयाेजन

भविष्यातील नवा मतदार राज्याला याेग्य पद्धतीने घडविण्यासाठी निवडणूक आयाेगाने पुढाकार घेतला आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ५० प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे.

अकाेला : निवडणूक, राजकारण यापासून काेसाे दूर असलेल्या भविष्यातील मतदार राजाला शाळेतच जागरुक करण्याचा नवा उपक्रम निवडणूक आयाेगाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर एका स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात राज्यातील प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून हाेणार आहे.

लाेकांनी लाेकांसाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे लाेकशाही अन् त्याचा राजा म्हणजेच मतदार. पण, आज लाेकशाहीचा हा राजा आपले बहुतांश अधिकार विसरला आहे. निवडणूक आल्यावर मतदान करणे आणि गप्प बसणे एवढ्यापुरताच मतदार राजा उरला आहे. या मतदारांना जागे करण्यापेक्षा भविष्यातील नवा मतदार राज्याला याेग्य पद्धतीने घडविण्यासाठी निवडणूक आयाेगाने पुढाकार घेतला आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ५० प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे. जाे विद्यार्थी स्थानिक ते राष्ट्रीयस्तरावर प्रथम येईल त्याला निवडणूक आयाेगामार्फत प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या माध्यमातून भविष्यातील जागरुक मतदार राजा घडणार हे नक्की.

असा आहे उपक्रम
माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्वप्रथम शाळास्तरावर ५० प्रश्नांची परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येक शाळेतील दाेन विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणखी एक परीक्षा घेतली जाईल. त्यातून राज्यस्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारची परीक्षा घेतली जाईल.

या विषयांवर राहणार भर
मतदान प्रक्रिया, राज्य आणि केंद्र शासनाची संसदीय व्यवस्था, भारतीय लाेकशाही तसेच राज्यघटनेवर ही परीक्षा आधारित राहील. यामध्ये विद्यार्थ्यांना किमान ३० ते ५० प्रश्न विचारण्यात येतील.

अकाेल्यात मंगळवारी परीक्षा
उपक्रमांतर्गत अकाेला जिल्ह्यात मंगळवारी (ता.७) पहिली परीक्षा घेण्यात येईल. यासाठी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका काढण्यात येईल. प्रत्येक शाळेतून दाेन विद्यार्थ्यांचा निकाल आल्यावर त्यांची जिल्हास्तरीय परीक्षा हाेईल.

भविष्यातील मतदार जागरुक राहावा, या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयाेगाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मंगळवारी नवमतदार जागृती अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येईल. परीक्षेनंतर शाळांनी आपला निकाल शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करावा.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. अकाेला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: akola news election commission initiative in schools