माजी सैनिकांनाही सामान्य कराच्या नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

मनपाच्या देयकांवर खासगी कंपनीची जाहीरात
महापालिकेच्या मालमत्ता कराच्या देयकांवर स्थापत्य कंपनीचा लोगो आणि नाव टाकून जाहीरात करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या कामासाठी कंपनीने महापालिकेकडून मोठा मोबदला घेतला आहे. असे असतानाही कोणत्याही परवानगी शिवाय कंपनीने मनपाच्या देयकांवर जाहीरात करून मनपाचे आर्थिक नुकसान केले आहे.

अकोला : महापालिका हद्दीतील मालमत्तांना कर आकारणी करताना माजी सैनिकांना सामान्य करातून सुट देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत घेण्यात आला होता. शासन निर्णयाच्या अधिन राहून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतरही सुधारित मालमत्ता कराच्या दरानुसार माजी सैनिकांना देयकाच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

महापालिका हद्दीतील व वाढीव हद्दील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यानुसार मालमत्तांचे देयक तयार करण्याचे काम स्थापत्य या खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे थेट मनपाच्या धोरणांनाच फटका बसला असल्याची बाब उजेडात आली आहे. मालमत्ता कर आकारणी करताना माजी सैनिकांना केवळ शैक्षणिक आणि पाणीपट्टी कराचीच आकारणी होत असे. सामान्य करातून माजी सैनिकांना सुट देण्यात आली आहे. मात्र, पूर्व झोनमधील मालमत्ता धारकांना सुधारित दरानुसार मालमत्ता कराचे देयक पाठविताना माजी सैनिकांनाही सामान्य कर थकित रकमेसह पाठविण्यात आले असल्याची बाब उजेडात आली आहे. या प्रकारामुळे मालमत्ता कराचे सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीच्या एकूण कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

मनपाच्या देयकांवर खासगी कंपनीची जाहीरात
महापालिकेच्या मालमत्ता कराच्या देयकांवर स्थापत्य कंपनीचा लोगो आणि नाव टाकून जाहीरात करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या कामासाठी कंपनीने महापालिकेकडून मोठा मोबदला घेतला आहे. असे असतानाही कोणत्याही परवानगी शिवाय कंपनीने मनपाच्या देयकांवर जाहीरात करून मनपाचे आर्थिक नुकसान केले आहे.

मनपाने माजी सैनिकांना सामान्य कर आकारून त्यांचा अवमान केला आहे. तसेच खासगी कंपनीने पूर्वपरवानगी शिवाय त्यांची देयकांवर जाहिरात केली आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात यावी व जाहिरातीची रक्कम त्यांच्याकडून वसुल करण्यात यावी. अन्यथा झोन कार्यालयात आंदोलन करण्यात येईल.
-ऍड. धनश्री देव-अभ्यंकर, गटनेत्या, भारिप-बमसं.