ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच- खासदार अरविंद सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

न्यायाकरिता आलेल्‍या शेतकऱ्यांपुढे उद्‌गार

अकोला : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ असे नाव देऊन, शेतकऱ्यांना योजनेंतर्गत कर्जमाफी दिल्याचा सरकारने गाजावाजा केला. परंतु, केवळ प्रमाणपत्रातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचे वास्तव याठिकाणी पाहायला मिळाले. त्‍यांच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा न होणे शेतकऱ्यांची एकप्रकारे क्रूर थट्टा आहे, असे उद्‌गार खासदार अरविंद सावंत यांनी  शनिवारी (ता. ४) कर्जमाफीच्‍या नावाखाली प्रमाणपत्र मिळाल्‍याची कैफियत मांडण्यासाठी आलेल्‍या शेतकऱ्यांसमोर  काढले. तसेच राज्‍यसरकारच्‍या कामगिरीची ही पावती असल्‍याचेही ते म्‍हणाले.

‘साहेब कर्जमाफीच्या नावाखाली आम्हाला केवळ प्रमाणपत्रच मिळाले. प्रत्यक्ष लाभ मिळालाच नाही. कृपया प्रत्यक्षात आम्हाला न्याय मिळवून द्या’, अशी आर्तसाद कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी शनिवारी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे केली. ते जिल्हा दौऱ्यावर शासकीय विश्रामगृह येथे थांबलेले असताना शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन प्रत्यक्षातील कर्जमाफीची फसगतीबाबत माहिती दिली.  

कर्जमाफीच्या यादीमध्ये व कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळविलेले आगर, पातूर, मूर्तिजापूर येथून प्रसंदास राठोड, अजय कराळे, पंजाब इंगळे, सागर लांडे आदी शेतकरी शासकीय विश्रामगृह येथे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेण्यासाठी पोहचले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत  त्यांना जिल्हा प्रशासनाने १८ आॅक्टोबर रोजी दिवाळीची भेट म्हणून, कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्रानंतर त्यांच्या बँक खात्यात एक दमडीही जमा झाली नसल्याचे वास्तव खासदार अरविंद सावंत यांना सांगितले. त्यांच्यापैकी काही शेतकऱ्यांना प्रशासनाने चुकीचे प्रमाणपत्र दिल्या सांगून, ते परत मागीतल्याची बाबही याठिकाणी उघड केली.

शासनाकडून शेतकऱ्यांना प्रमाणपत्राच्या नावाखाली केवळ प्रसिद्धीपत्रके दिले आहेत. प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मात्र, कोणालाच मिळाला नाही. त्यामुळे आपण या फसवणुकीचा जाब मागून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी सावंतांना केली. तेव्हा ही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक असून, त्याबद्दल जिल्हाधिकारी आस्तिककुमार यांना भेटून, विचारणा करू, असा विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनाकडे व्यक्त केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :