शेतसाऱ्याच्या रकमेतून करा कर्जमुक्ती- प्रकाश आंबेडकर

याेगेश फरपट 
गुरुवार, 1 जून 2017

हे आंदाेलन शेतकऱ्याला नुकसानकारक पाेहाेचवणारे आहे. शेतकरी भरत असणारा शेतसारा पूर्णपणे कर्जमुक्तीसाठी वापरावा. ही मागणी शासनाकडे रेटून धरायला हवी.

अकाेला : सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला याेग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसाेबत आम्ही आहाेत. पण शेतकऱ्यांच्या नेत्यांनी पुकारलेला संपाचा मार्ग अयाेग्य आहे. या आंदाेलनाला आमचा विराेध आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी जमा हाेणाऱ्या शेतसाऱ्याची रक्कम वापरता येवू शकते असा सल्लाही भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी दिला. 

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत अकाेला येथे आज (ता.१) आयाेजीत पत्रकार परिषदेत त्यांनी शेती व सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, कामगार जेव्हा संपावर जाताे, तेव्हा मालकाचे नुकसान हाेते. त्यामुळे मालक कामगारांच्या बाजुने सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य हाेताे. पण शेतकऱ्यांनी पुकालेल्या या आंदाेलनाने बळीराजाचेच जास्त नुकसान हाेत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तर जमा हाेणाऱ्या शेतसाऱ्याच्या रकमेतून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शासनाने करावी असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. 

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून शेती मालाला हमी भाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतीसाठी मुबलक पाणी व वीज पुरवठा सुरळीत करावा. तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यत नाफेड द्वारे खरेदी करावी अशा विविध मागण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. काही ठिकाणी राज्यात शेतमाल, दूध फेकून देण्याचे प्रकारही झालेत. पण यामुळे काहीही साध्य हाेणार नाही. उलट शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान हाेईल.

आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहाेत पण आमचा संपाला पाठींबा नाही असे स्पष्ट मत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले. हे आंदाेलन शेतकऱ्याला नुकसानकारक पाेहाेचवणारे आहे. शेतकरी भरत असणारा शेतसारा पूर्णपणे कर्जमुक्तीसाठी वापरावा. ही मागणी शासनाकडे रेटून धरायला हवी. पर्याय मार्केट उभारण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी चर्चा करायला पाहिजे. दाेन व्यापाऱ्यांचे पर्याय उपलब्ध झाल्यास निश्चित शेतमालाला भाव मिळू शकेल असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.