बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव...

बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव...
बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव...

अकोलाः ‘बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव’, म्हणे जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू केले, पण नावालाच! एकरी दोन क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन घ्यायला तयार नाही, अन् त्यातही ओलीचे प्रमाण १२ टक्क्यापेक्षा अधिक सांगून खरेदीला नकार मिळत आहे. अनुदान नाही, पीक कर्ज नाही, शेतमालाला भाव नाही, कर्ज माफीचा लाभ नाही, एवढेच काय तर, शेतमाल खरेदी करायलाही सरकार तयार नाही. हा तर इंग्रजांपेक्षाही अधिक जुलुम होत आहे, अशा तिव्र भावना सोयाबीन विक्रीसाठी अकोला केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

हमीभावातून शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता व गती मिळावी याकरिता शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीपूर्वी आॅनलाइन नोंदणी करणे सक्तीचे केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वप्रथम त्यांचेकडील शेतमालाची उपलब्धता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदवावी लागत आहे. त्यानंतर त्यांना शेतमाल विक्रीसाठी ठराविक दिवशी हमीभाव केंद्रावर बोलावले जात आहे. जिल्ह्यात सध्या सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकरी ऑनलाइन नोंद करून, ते विक्रीकरिता उपलब्ध पाच केंद्रावर आणत आहेत. परंतु, त्यांचे सोयाबीनला १२ टक्क्यांहून अधिक ओल असल्याचे कारण सांगून, खरेदीसाठी नकार मिळत आहे. तसेच जिल्ह्यात एकरी केवळ दोन क्विंटल सोयाबीनची झडती लागल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने सादर केल्याने, दोन क्विंटलच्या मर्यादेतच शेतकऱ्यांकडून सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना एकरी सहा ते आठ क्विंटल सोयाबीन उत्पादन झाले असले तरी, त्यांचेकडून एकरी दोनच क्विंटलचीच खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित सोयाबीन केवळ १४०० ते २५०० रुपये दराने बाजारात व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. सोयाबीन विक्रीसाठी तसेच नोंदणीसाठी बुधवारी अकोला हमीभाव केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना, शासकीय खरेदी केंद्र केवळ देखावा असल्याच्या तिव्र भावना व्यक्त केल्या.

खरेदीचे प्रमाण क्विंटल की कट्टा
कृषी विभागाने दिलेल्या सरासरी उत्पादन अहवालानुसार हमीभाव केंद्रांवर एकरी दोन क्विंटल सोयाबीन, एकरी १.४५ क्विंटल मूग व एकरी १.४३ क्विंटल उडदाची खरेदी केली जात आहे. परंतु, खरेदी विक्री संघाद्वारे प्रत्यक्ष खरेदी करताना ५० किलो प्रमाणे कट्ट्यानुसार सोयाबीन, मूग, उडदाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे एक क्विंटलवरील जरी ४० ते ४५ किलोचे कट्टे खरेदीसाठी केंद्रावर नकार मिळत असल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ-संध्याकाळ बदलते धान्याची ओल
हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या सोयाबीन, मूग, उडदाचे ग्रेडींग करताना सकाळ, दुपार व संध्याकाळी वेगवेगळी ओलीचे प्रमाण मिळत आहे. उपलब्ध ग्रेडींग मशीन सभोवतालच्या आद्रतेनुसार शेतमालाची ओल दर्शवित असल्याचे यावेळी ग्रेडर कर्मचऱ्यांनी सांगितले. याचा फटका मात्र, ज्यांच्या शेतमालाची ग्रेडींग सकाळी किंवा संध्याकाळी होत आहे, त्यांना बसत आहे.

ग्रेडींग मशीनवर सकाळी व संध्याकाळी ओल जास्त दाखवत असून, दुपारी त्याच शेतमालाची ओल कमी दाखवत आहे. ही बाब लक्षात घेता आम्ही बहुतांश ग्रेडींग दुपारी ४ वाजेपर्यंतच करून, त्यांची खरेदी सकाळी करत आहोत.
- राजेश गावंडे, ग्रेडर, कृउबास, अकोला

वेअर हाऊसमध्ये साठवणुकीसाठी केवळ ५० किलोचे कट्टे घेतले जात आहेत. तसेच आॅनलाइन नोंदणीमध्ये एकरी मर्यादा आखुन दिली असल्याने, त्यापेक्षा १०० ग्रॅम सुद्धा धान्य स्वीकारले जात नाही. परंतु, शेतकऱ्यांना यामुळे कोणतेही नुकासान झाले नसून, कमी जास्त शेती क्षेत्रानुसार आखीव मर्यादेत सोयाबीन, मूग, उडदाचे कट्टे भरून त्यांची खरेदी होत आहे.
- नीरंजन काटोळे, खरेदी-विक्री संघ, अकोला

मला एकरी सहा क्विंटल प्रमाणे चार एक्करात २५ क्विंटल सोयाबीन उत्पादन झाले. परंतु, हमीभाव केंद्रावर एकरी एक क्विंटल ९८ किलो या मर्यादेतच सोयाबीन खरेदी केली जात आहे. तेव्हा उर्वरीत सोयाबीनचे काय करायचे? शिवाय १२ टक्के ओलीची अट असल्याने, दोन क्विंटल सोयाबीन खरेदीचीसुद्धा शाश्वती नाही.
- सम्राट भिसे, खिरपूर, शेतकरी

याठिकाणी ओळखीच्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. दिलेल्या तारखेनुसार आलेल्या शेतकऱ्यांएवजी पूर्वीच्या तारखेतील शेतकऱ्यांचे सोयाबीन येथील कर्मचारी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांविषयी शासनाचे धोरण इंग्रजापेक्षाही जुलुमी झाले आहे.
- जयराम राजेंद्र पवार, देगाव मानकी, शेतकरी

हमीभाव केंद्र सुरू केले खरे परंतु, सोयाबीन मोजणीसाठी याठिकाणी व्यवस्थासुद्धा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीच करायचे नसल्याची मनिषा येथील अधिकाऱ्यांची दिसत आहे.
- गजानन जानोकार, पाठखेड, शेतकरी

शेतात जेवढे सोयाबीन उत्पादीत झाले तेवढेच शेतकरी विक्रीला आणेल, तेव्हा एकरी दोन क्विंटलची मर्यादा कशासाठी? ओलीची टक्केवारीचा बाऊ विनाकारण केला जात आहे. शासनाला खरोखर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करायचे असेल, तर खरेदी मर्यादा व ओलीची अट रद्द करावी.
- प्रकाश राऊत, निपाणा, शेतकरी

केवळ केंद्र सुरू केल्याची औपचारीकता दिसत आहे. सोयाबीन खरेदीसाठी येथे कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. तेव्हा शासनाने याठिकाणी चालढकलीचे बाजू दूर सावरत शेतकऱ्यांच्या हितासाठी यंत्रणा उभारून, विना अट सोयाबीन खरेदी करावी.
- रामेश्वर कुकडे, वैराट राजापूर, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com