अकोला: अखेर कार्यमुक्तीचे आदेश धडकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

जितेंद्र वाघ नवे आयुक्त
अकोला महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण येथे प्रतिनियुक्तीवर आहे. त्यांना एक वर्षाकरिता अकोला मनपा आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीवर पाठविले जात आहे. त्यांना तत्काळ नियुक्त होण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.

अकोला : प्रशासकीय वर्तुळात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असणारे आणि शहराच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचे धाडस दाखविणारे महापालिका आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली होती. या बदली आदेशानंतर तब्बल तीन महिन्यांनी त्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश महापालिकेत धडकला. दोन दिवस शासकीय सुटी आल्याने सोमवारी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपविणार आहे.

महसूल विभागात उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त अजल लहाने यांना दोन वर्षांपूर्वी नगरविकास खात्यात प्रतिनियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अनेक अर्थांनी गाजला. या दरम्यान नगरविकास खात्याने त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढवून न मागितल्यामुळे ७ ऑगस्ट रोजी महसूल विभागाने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांचे यवतमाळ जिल्‍ह्यात उपजिल्हाधिकारी पदावर स्थानांतर करण्यात आले होते. मात्र, नगरविकास विभागाने त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश न काढल्यामुळे ते आयुक्तपदावर कायम होते. अखेर तीन महिन्यांनंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा आदेश १० नोव्हेंबर रोजी उपसचिव सं.श. गोखले यांच्या स्वाक्षरीने मनपात धडकले. या आदेशानुसार नवीन आयुक्त रूजू होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून आयुक्त लहाने यांना यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी (महसूल) या पदावर तत्काळ नियुक्त व्हावयाचे आहे.

सप्टेंबर २०१५ मध्ये झाले होते रूजू
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांची बदली झाल्यानंतर १२ सप्टेंबर २0१५ रोजी अजय लहाने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. आयुक्त लहाने यांच्या कार्यकाळात मनपातील महत्त्वाची पदे रिक्त होती. त्यांनी प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी रिक्त पदांवर सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामस्वरूप सर्व रिक्त पदांवर शासनाने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या.

लोकप्रतिनिधींच्या राजकारणात बळी!
भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे अजय लहाने यांची बदली झाल्याचे बोलल्या जाते. एका प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा हकनाक बळी गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

जितेंद्र वाघ नवे आयुक्त
अकोला महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण येथे प्रतिनियुक्तीवर आहे. त्यांना एक वर्षाकरिता अकोला मनपा आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीवर पाठविले जात आहे. त्यांना तत्काळ नियुक्त होण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.

अविश्‍वासापूर्वीच कार्यमुक्त
मनपा आयुक्तांंच्या विरोधात सत्ताधारी भाजपकडून अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा हालचाली सुरू होत्या. त्यासाठी ५१ सदस्यांनी महापाैरांना पत्रही दिले होते. प्रस्ताव दाखल करण्यासाठी सभाच बोलाविण्यात आली नाही. त्यापूर्वीच आयुक्त कार्यमुक्त झाल्यामुळे अविश्‍वास येण्यापूर्वीच बारगळला आहे.

आयुक्त लहाने यांची कारकिर्द
- थकीत वेतनाची समस्या लक्षात घेऊन जीपीएस प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारित कर लागू केला. ज्यातून मनपाला ७० ते ८० कोटी रुपयांचे उत्पन्ना मिळणार आहे.
- प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यामध्ये एलईडी पथदिवे उभारण्याच्या कामाला त्यांनी सुरुवात केली.
- घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटा गाड्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. कचऱ्याच्या मुद्यावर खर्च जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाच्या स्तरावर १६ ट्रॅक्टरची खरेदी केली.
- सिटी बस सेवेचा करारनामा मनपाच्या हिताचा करून बस सेवा सुरू केली.
- गोरक्षण रोडवरील रस्ता रुंदीकरणाचा पेच सोडवित या रस्त्याचे काम मार्गी लावले.