सोयाबीनला शेंगाच नाहीत, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

अनिल दंदी
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेंगा नसल्याचे लक्षातच नाही आले. सकाळ मध्ये वाडेगावातील अशा आशयाची बातमी वाचली व शेत गाठले. तेव्हा हे लक्षात आले. अळीचा प्रादुर्भाव व पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. 
- किशोर बोरोकार, शेतकरी

बाळापूर (अकोला) : तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नाही. परिसरात तब्बल महीणाभर पावसाने दिर्घ विश्रांती घेतल्याने हजारो हेक्टरवरील खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले असून त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असली तरी वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरली आहे. परिणामी सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यावर खुप मोठे संकट ओढवले आहे.
संपुर्ण तालुक्यात प्रारंभी बरसलेल्या पावसावर खरीपाची पेरणी केली. मात्र त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मूग उडीदाची पिकेही करपुन गेली आहेत. सोयाबीन पिकावर रोगराईचा प्रदुर्भाव होत आहे.चक्री भुंगा आणि विविध प्रकारच्या आळ्यामुळेही सोयाबीन धोक्यात सापडले आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे  उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालूक्यातील काही गावांत सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनची वाढ देखील चांगली झाली. सोयाबीन शेंगा येण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने तब्बल महिनाभर ओढ दिली. यातच सोयाबीनवर उंट व खोड अळींचा मोठा प्रादुर्भाव झाला. सोयाबीनची वाढ झाली असली तरी सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. परिणामी सोयाबीनचे उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 
 
सकाळच्या वृत्तामुळे सोयाबीनची पाहणी
वाडेगांव परीसरातील शेंगा न लागलेल्या सोयाबीनचे वृत्त  सकाळ मध्ये प्रकाशीत झाल्यानंतर रिधोरा गावांतील शेतकऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील शेकडो हेक्टरवर सोयाबीनला शेंगा नसल्याचे निदर्शनास आले.
 येथील शेतकरी संजय अघडते, रामदास अघडते, तुळशीराम करणकार, किशोर बोरोकार, गणेश मिश्रा, दिनकरराव देशमुख, संतोष वसतकार, पुरुषोत्तम कवळकार, रामभाऊ कवळकार, सुनीता बोरोकार, सुभाष वसतकार, केशव दांदळे, सरला बोळे, अशोक बोळे यांच्या शेतातील सोयाबीनला शेंगा नसल्याने संबधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण  करावे अशी मागणी केली आहे.

सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेंगा नसल्याचे लक्षातच नाही आले. सकाळ मध्ये वाडेगावातील अशा आशयाची बातमी वाचली व शेत गाठले. तेव्हा हे लक्षात आले. अळीचा प्रादुर्भाव व पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. 
- किशोर बोरोकार, शेतकरी