अकोला: अपघातात एक जण ठार; अपघातस्थळी सापडले चाकू

अनिल दंदी
शनिवार, 15 जुलै 2017

धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा-लोणी शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा सडा, अपघातग्रस्त दुचाकी व बाजूला दोन करकरीत चाकू पडल्याचे रिधोरा येथील फिरायला गेलेल्या युवकांच्या निदर्शनास आले.

बाळापूर (अकोला) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन त्यावरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे उघडकीस आली.

धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा-लोणी शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा सडा, अपघातग्रस्त दुचाकी व बाजूला दोन करकरीत चाकू पडल्याचे रिधोरा येथील फिरायला गेलेल्या युवकांच्या निदर्शनास आले. त्या युवकांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रात्री केव्हातरी हा अपघात झाला असल्याचे समजते.

याबाबत पोलिसांना कुठल्याही प्रकारची पुसटशी कल्पनाही नव्हती. सोशल मिडीयावरून हि पोस्ट व्हायरल झाल्याने दहा वाजताच्या सुमारास बाळापूर व जुनेशहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक बनावट असल्याचा संशय बाळापूर पोलिसांनी व्यक्त केला. मार्गाच्या बाजुला गवतात दोन धारदार चाकू आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

अकोट फाईल येथील मतीनोद्दन अलीमोद्दान या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र घटनास्थळावर चाकू आढळल्याने पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. सदर प्रकरण जुनेशहर पोलीसांच्या हद्दीत येत असून तपास सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :