अकोला: रिधोरा येथे पंधरा दिवसांपासून कृत्रिम पाणि टंचाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उदासीन धोरणामुळे पंधरा दिवसांपासून बाळापूर तालुक्‍यातील रिधोरा येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

बाळापूर (जि अकोला) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उदासीन धोरणामुळे पंधरा दिवसांपासून बाळापूर तालुक्‍यातील रिधोरा येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

विद्युत पुरवठा खंडीत असल्याने भर पावसाळ्यात हि समस्या भेडसावत असून या बाबत म.रा. वि.वि.कंपनीच्या कर्मचारी व अधीकाऱ्यांना वारंवार सांगूनही उपयोग होत नाही. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाला औद्योगिक वसाहतींचा वेढा असून म.रा.वि.वी.कं.च्या दोन रोहीत्रावरुन गावाला विद्युत पुरवठा होतो. गावाचा वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो.मात्र कर्मचारी नेहमीच कारखान्यांच्या कामात व्यस्त असतात.विशेष म्हणजे विद्युत वितरण कंपनीचा एकही कर्मचारी मुख्यालयात राहत नसून अकोला येथे वास्तव्यास आहेत. रात्री - बेरात्री विद्युत पुरवठा खंडीत होतो.यामुळे नागरीकांना खुप मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत पंधरा दिवसांपासून गावातील विद्युत पुरवठा सुरु असला तरी विजेचा दाब कमी असल्याने याचा काहीच फायदा नाही.विंधन विहीरीसुद्धा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे.