‘एसटी’चा चक्काजाम; १९०० बस फेऱ्या रद्द 

ST bus
ST bus

अकाेला ; वेतन आयाेगासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत विविध कामगार संघटनांनी साेमवारच्या (ता. १६) मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू केला. या संदर्भात साेमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत एसटी महामंडळातील संघटनांच्या आयाेग कृती समितीची बैठक वर्षा निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीत काेणत्याच प्रकारचा ताेडगा निघाला नसल्याने संघटनांनी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला. 

सातव्या वेतन आयाेगासह सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी लागू करण्याची प्रमुख मागणी एसटी महामंडळातील कामगार संघटना करीत आहेत. एसटी अत्यावश्यक सेवेत असल्याकारणाने कायद्यानुसार कामगारांना संप पुकारता येत नाही. मात्र, यासाठी मतदान घेतल्यास व त्यात संपासाठी हाेकार आल्यास संप नियमबाह्य ठरत नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने काही दिवसांआधी संपासाठी राज्यभर मतदान घेण्यात आले. यात ८७ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने काैल दिला. मात्र, त्यानंतरही थेट संपाचा निर्णय न घेता महामंडळ व राज्य शासनाशी संघटनेने चर्चा केली. परंतु, त्यावर ताेडगा निघाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने संपाचे हत्यार उगारण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसा संप झाल्यास महामंडळाचे आर्थिक नुकसान तर हाेईलच त्यासाेबतच दिवाळीत प्रवाशांची सुद्धा गैरसाेय हाेईल ही बाब लक्षात घेवून संप टाळण्यासाठी साेमवारी (ता. १६) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस व संघटनांच्या आयाेग कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीतर्फे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणीसह सातवा वेतन आयाेग देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री महाेदयांनी सातवा वेतन आयाेग सद्यस्थितीमध्ये देण्यास असमर्थता दर्शविली. परंतु एसटी कामगारांच्या वेतनासाठी प्रधान सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचा प्रस्ताव दिला व संप मागे घेण्याबाबत विनंती केली. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये एसटी कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भातील तीव्र भावनांचा विचार करून आयाेग कृती समितीने साेमवारच्या (ता. १६) मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवत मध्यरात्रीपासून संप सुरू केला. कामगार व इंटक संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे मध्यरात्रीपासून महामंडळाची बससेवा काेलमडल्याचा दावा संघटनेच्या स्थानिक प्रतिनिधींनी केला आहे. परंतु कामगार सेनेचा संपात सहभाग नसल्यामुळे संपाची तीव्रता कमी राहिल, असा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

कामगारांच्या प्रमुख मागण्या 
- एसटी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे हवे. त्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणीसह सातवा वेतन आयाेग लागू करा. 
- १ मार्च २०१६ पासून हंगामी वेतन वाढ लागू करा. 
- १ जुलै २०१६ पासूनचा सात टक्के व जानेवारी २०१७ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह त्वरीत लागू करा. 
- कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करून सन् २००० पासून त्यांच्या वेतनातील विसंगती दूर करा. 
- करार कायदे परिपत्रकांचा भंग करून आकसपूर्ण घेतलेले निर्णय व बदल्या रद्द करा. 
- सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पती-पत्नीस ५०० रूपये भरून वर्षभर माेफत पास द्या. 

दिवाळीत एसटीचे ‘दिवाळे’ 
दिवाळीच्या सुट्यात बाहेरगावी काम करणारे नाेकरदार, शिक्षण घेणारे विद्यार्थी व इतर नागरिक आपल्या गावी जातात. त्याचप्रमाणे भाऊबीज निमित्त बहिणी सुद्धा माहेरी जातात. याच एेन हंगामाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यानंतर ताे कायम राहिल्यास एसटीचे प्रचंड आर्थिक नुकसान हाेईल. त्याचप्रमाणे प्रवाशांची सुद्धा गैरसाेय हाेईल. 

मुख्यमंत्र्यांसाेबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे साेमवार (ता. १६) मध्यरात्रीपासून राज्यव्यापी चक्काजाम आंदाेलन सुरू हाेईल. अकाेला, वाशीम जिल्ह्यातून तीन हजार १०० कामगार संपात सहभागी हाेतील. 
- अविनाश जहागिरदार, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, अकाेला विभाग.  

बस स्थानकावर शुकशुकाट 
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ साेमवारी रात्री ९ वाजतापासूनच प्रवाशांना बसली. अकोल्यातील दोन्ही बस स्थानकावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. संपामुळे नेहमी गजबजलेल्या बस स्थानकात सोमवारी शुकशुकाट होता. लांब पल्ल्यांच्या गाड्या अकोला येथे थांबवून प्रवाशांना अकोल्यातच उतरून देण्यात आले.   

अकोला विभागीती स्थिती 
१९००ः विभागातील दरराेज बस फेऱ्या 
४१६ ः नऊ आगारांतून दरराेज धावणाऱ्या बस 
१.३० लाख ः हजार प्रवाशांची दरराेज वाहतूक 
३५ ते ४० लाख ः विभागीचे दरराेजचे उत्पन्न 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com