आमदार बच्चू कडूंनी विपणन अधिकाऱ्यांना कोंडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

तूर खरेदीच्या प्रश्‍नावर प्रहार संघटनेकडून आक्रमक पवित्रा

तूर खरेदीच्या प्रश्‍नावर प्रहार संघटनेकडून आक्रमक पवित्रा
अकोला - तूर खरेदीच्या प्रश्‍नावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी (ता. 4) जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला. तेथे त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घेतले. तुरीची थकीत रक्कम आणि नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याची मागणी करत त्यांनी शेतकरी नेते प्रशांत गावंडे, मनोज तायडे या शेतकरी नेत्यांसह कार्यालयातच ठिय्या दिला. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले.

शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. अमरावती विभागातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. शिवाय शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाफेडकडून नोंदणी करण्यात आलेली तूरही खरेदी केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आमदार कडू शेतकरी नेत्यांसह अकोला जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयात पोहोचले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत मे महिन्यापर्यंत आलेली शेतकऱ्यांची तूर अद्याप का मोजली नाही, असा सवाल केला.

अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मागणी पूर्ण होईपर्यंत कार्यालयातच ठिय्या देण्याचा निर्णय कडू यांनी घेतला. कार्यालयाचे प्रवेशद्वार आतून बंद करून घेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विपणन अधिकाऱ्यांना घेराव घालता. या आंदोलनामुळे पोलिसांना कार्यालयात बोलाविण्यात आले. या वेळी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधून कडू यांना माहिती दिली. विभागातील सर्व शेतकऱ्यांची तुरीची थकीत रक्कम तीन दिवसांत अदा करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.