अकोल्यात लवकरच पासपोर्ट कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

अकोला - अकोल्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने पासपोर्ट कार्यालयासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.

व्यवसाय, पर्यटन आदी कामांसाठी विदेशात जाणाऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या अडचणीच्या प्रक्रियेतून जावे लागत होते. त्यामुळे पासपोर्ट काढून देणाऱ्यांची एक साखळी निर्माण झाली होती. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी नागपूरला जावे लागत असते. पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पासपोर्ट कार्यालय अकोल्यातच स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यानुसार 2015 मध्ये प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता.

अकोला जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रस्ताव काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. या संदर्भात डॉ. रणजित पाटील यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना सूचना करीत सर्व तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी एक कोटी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला; तसेच इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पासपोर्ट नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत असावी असा उल्लेख प्रस्तावात आहे.