रेल्वे अपघातांची चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

अकोला - मूर्तिजापूर तालुक्‍यातील कुरुम रेल्वे स्थानकाजवळ पाच दिवसांत तीनवेळा रेल्वे गाडी रुळावरून घसल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसली तरी वाहतुकीवर परिणाम झाला होता. एकाच मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे या प्रकारणाची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर या अपघातासाठी कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईसुद्धा करण्यात येईल.

कुरुम रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा एक रिकामा डबा रुळावरून खाली घसरण्याची घटना 7 जुलै रोजी सायंकाळी घडली होती. त्यानंतर त्याच आठवड्यात 11 जुलैला दुपारी सव्वाच्या दरम्यान त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा रेल्वे गाडीचा डबा रुळावरून घसरला. या घटनेनंतर 12 जुलैला सायंकाळी साडेसातला मूर्तिजापूर तालुक्‍यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मालगाडीचा डबा घसरल्याची घटना घडली.