शेतकऱ्यांना दोन दिवसांत तुरीचे चुकारे मिळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

अकोला - दसरा तर गेला, किमान दिवाळी तरी साजरी करता यावी याकरिता, जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांची तुरीच्या चुकाऱ्यांकडे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि जिल्ह्यातील रखडलेल्या चुकाऱ्यांची रक्कम पणन महासंघाने खरेदी-विक्री संघाकडे वर्ग केली. येत्या दोन दिवसांत सर्व 78 कोटी रुपयांची चुकारे संबधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वितरीत होतील, असा विश्वास पणन महासंघाने व्यक्त केला.

ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एक लाख 56 हजार 376 क्विंटल तूर खरेदी नाफेड केंद्रांवर आली. मात्र खरेदी केलेल्या तुरीला किती दर द्यायचे याची निश्‍चितीच झाली नसल्याने, तूर उत्पादकांना चुकारे कधी मिळतील याची शाश्वती नव्हती. हमीदर व बोनसची रक्कम असे प्रतिक्विंटल पाच हजार 50 रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्यांची तूर सरकारने खरेदी केली, मात्र पैसे दिले नसल्याने, तूर उत्पादकांना दसराही साजरा करता आला नाही. आता दिवाळीपूर्वी चुकाऱ्यांची रक्कम द्यावी, अशी मागणी केली जात होती. "सकाळ'ने शेतकऱ्यांची व्यथा व मागणी वृत्तातून सरकारपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे व दिलीप लोडम यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भेटून चुकारे मिळणेबाबत मागणी केली होती. सकाळ व शेतकरी जागर मंचाच्या पुढाकारने सरकाने तुरीचे चुकारे दिवाळीपूर्वी अदा करण्याचा निर्णय घेतला.