डॉ. काळेंना पडला ‘फाउंडेशन’चा विसर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - काही माणसांना यशाच्या धुंदीत पहिल्या पायरीचाच विसर पडतो. याची प्रचिती डॉ. अक्षयकुमार काळे देत असल्याची भावना साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी ज्या वास्तूत, ज्या मंडळींनी त्यांच्यासाठी ‘फाउंडेशन’ तयार केले, त्याचाच विसर डॉ. काळे यांना कसा काय पडला, असा प्रश्‍नही जाणकार उपस्थित करीत आहेत.

नागपूर - काही माणसांना यशाच्या धुंदीत पहिल्या पायरीचाच विसर पडतो. याची प्रचिती डॉ. अक्षयकुमार काळे देत असल्याची भावना साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठी ज्या वास्तूत, ज्या मंडळींनी त्यांच्यासाठी ‘फाउंडेशन’ तयार केले, त्याचाच विसर डॉ. काळे यांना कसा काय पडला, असा प्रश्‍नही जाणकार उपस्थित करीत आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. काळे उत्तम समीक्षक आहेत. गालिबच्या शायरीवरील त्यांचा अभ्यास सर्वश्रृत आहे. कविवर्य ग्रेस यांची त्यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही रसिक जाणतो. त्यांचा शिष्य वर्गही अख्ख्या महाराष्ट्रात आहे. परंतु, संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरताना वेगळी तयारी आवश्‍यक असते. हे जाणूनच काळे यांच्यासाठी ‘वडीलधारी’ मित्राने तीन वर्षांपूर्वी पाया रचला. सत्कार सोहळा असो वा पुस्तक प्रकाशन. प्रत्येक कार्यक्रमात काळेंना प्रोजेक्‍ट करण्याची ‘अक्षय’ परंपरा चालवली. त्यांचा सारा खटाटोप काळे यांच्यासाठीच सुरू आहे, हे सहज लक्षात यावे एवढे कार्यक्रम झाले.

अगदी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या काही दिवसांपूर्वीदेखील ‘प्रचारसभा’ वाटावी, असे  काही कार्यक्रमदेखील ‘बाळ’साठी झाले. काळेच संमेलनाध्यक्ष झाले पाहिजे, यासाठी ‘भाऊं’च्या भूमिकेत येऊन मतदारांचे नेतृत्व करणाऱ्या काही मंडळींशीदेखील ते स्वतःच बोलले. परंतु, मतमोजणीच्या अगदी आठ-दहा दिवसांपूर्वी कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून आपल्यासाठी ‘फाउंडेशन’ तयार करणाऱ्या व्यक्तीबद्दल काळेंना अविश्‍वास वाटू लागला आणि त्यातून त्यांना ‘फाउंडेशन’ची ॲलर्जी झाली, असे बोलले जाते.

‘फाउंडेशन’ची पायरीही चढले नाही
मतमोजणी झाली आणि डॉ. काळेच संमेलनाध्यक्ष झाले. विजयाचे श्रेय ज्या मंडळींसोबत वाटून घ्यायला हवे, त्यांना न भेटताच डॉ. काळे डोंबिवलीचा सत्कार स्वीकारण्यासाठी रवाना झाले. सत्कार स्वीकारावा असा तोंडी निरोप त्यांच्याकडे पोहोचवला, तर थेट नकार दिला. आज अडीच महिने लोटले. दरम्यानच्या काळात संमेलनही आटोपले. परंतु, डॉ. काळे ‘फाउंडेशन’ची पायरीही चढलेले नाहीत.

मै नादान था...
काळेंनी एक-दोन नव्हे, तर अनेकांना ‘संमेलनाध्यक्षपद’ किती मोठे असते याची जाणीव करून दिली. दुर्दैवाने, ते एकच वर्षाचे असते. याचा विसर संमेलनाध्यक्षांना पडला असावा. ‘मै नादान  था जो वफा को तलाश करता रहा गालिब... यह न सोचा के एक दिन अपनी साँस भी बेवफा हो जाएगी’... अशी भावना काळेंबद्दल निकटवर्तीयांच्या मनात तयार झाली, तर त्यात काहीच आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

Web Title: akshay kumar kale