‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

नागपूर - प्रारूप आराखड्यामुळे अनेक नगरसेवक चिंतित असताना महापालिका प्रशासनाने खर्च कपातीसाठी प्रभागातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून मंजुरीचे परिपत्रक काढले. आचारसंहितेला तीन महिन्यांचा कालावधी असताना प्रभागातील विकासकामे रखडल्यास निवडणुकीत जनतेपुढे कसे जायचे? असा प्रश्‍न नगरसेवकांना पडला आहे. 

 

नागपूर - प्रारूप आराखड्यामुळे अनेक नगरसेवक चिंतित असताना महापालिका प्रशासनाने खर्च कपातीसाठी प्रभागातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून मंजुरीचे परिपत्रक काढले. आचारसंहितेला तीन महिन्यांचा कालावधी असताना प्रभागातील विकासकामे रखडल्यास निवडणुकीत जनतेपुढे कसे जायचे? असा प्रश्‍न नगरसेवकांना पडला आहे. 

 

‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ या म्हणीचा अनुभव सध्या नगरसेवक घेत आहेत. नुकतेच महापालिकेने प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार केला. यात अनेक नगरसेवकांना गठ्ठा मतांचा भाग दुसऱ्या प्रभागात जोडला जाण्याची भीती आहे. विशेषतः विरोधातील तसेच अपक्ष नगरसेवकांत ही भीती आहे. प्रारूप आराखड्यामुळे राजकीय कारकीर्द तर संपुष्टात येणार नाही? या चिंतेत विरोधी पक्षातील तसेच अपक्ष नगरसेवक आहेत. आता त्यात महापालिका प्रशासनाने खर्चात कपात करण्यासाठी प्रभागातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून मंजुरी देण्याचे परिपत्रक काढले. आचारसंहितेला तीन महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत शक्‍य तितकी विकासकामे करून जनतेला आकर्षित करण्यासाठी नगरसेवक प्रयत्नरत आहेत. अनेक नगरसेवक अभियंता,  अतिरिक्त आयुक्त, आयुक्त, वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडे विकासकामांच्या फायली घेऊन  फिरत आहेत. आचारसंहितेनंतर विकासकामे मंजुरींना ब्रेक लागणार असल्याने नगरसेवक विकासकामांसाठी अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने खर्च कपातीसाठी प्रभागातील विकासकामांना चाळणी लावण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून मंजुरी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे विरोधातील नगरसेवकांचे धाबे दणाणले असून, ही सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचाही आरोप होत आहे.

 

नगरसेवकांना करावा लागेल संघर्ष

प्रभागातील विकासकामे महत्त्वाची असून, ती प्राधान्यक्रमाने घ्या, असे ओरडता आता नगरसेवकांना अधिकाऱ्यांकडे फेऱ्या माराव्या लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यातून नगरसेवक व अधिकारी असा संघर्ष उभा राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

 

नगरसेवक संतप्त

प्राधान्यक्रम म्हणजे नेमके काय? पदाधिकारी की त्या प्रभागातील गरज, कुठल्या आधारावर प्राधान्यक्रम ठरणार? असा संतप्त सवाल एका विरोधी नगरसेवकाने केला. प्रभागात कुठले काम आवश्‍यक आहे, त्याचा प्राधान्यक्रम अधिकारी कसे ठरवणार? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.