'पहिल्या लढ्यातील पराभवाने सेना सावध'

'पहिल्या लढ्यातील पराभवाने सेना सावध'

अमरावती - लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप बराच कालावधी असला, तरी मतदारसंघाच्या बांधणीला प्रारंभ झाला आहे. अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांचा मार्ग मोकळा होत असल्याने शिवसेनेने गांभीर्याने तयारी प्रारंभ केली. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत त्याचे सूर उमटले. गतवेळच्या निवडणुकीत जातप्रमाणपत्राचा मुद्दा तापला. निवडणुकीनंतरही सेनेने याच मुद्द्यावर नवनीत राणा यांना जेरीस आणले; मात्र बाजी पलटली व निकाल नवनीत राणांच्या बाजूने गेला.

अमरावती शहर विधानसभा मतदारसंघासह बडनेरा, तिवसा, मेळघाट, दर्यापूर, अचलपूर या सहा मतदारसंघांचा समावेश अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेनेचे आनंद अडसूळ सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेत. राखीव असलेल्या या मतदारसंघात गतवेळी त्यांना नवख्या नवनीत राणा यांनी जोरदार टक्कर दिली. नवनीत राणांनी मिळवलेले मताधिक्‍य डोळ्यांत खुपण्यासारखे होते. गतवेळच्या निवडणुकीत जातप्रमाणपत्राचा मुद्दा तापला; मात्र तो टिकू शकला नाही. निवडणुकीनंतरही सेनेने याच मुद्द्यावर त्यांना जेरीस आणून निवडणूक रिंगणात त्या येणारच नाही, अशी रणनीती आखून लढाई सुरू ठेवली. यश टप्प्यात येणार, असे वाटत असतानाच निकाल नवनीत राणांच्या बाजूने गेला. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्या सेनेच्या प्रतिस्पर्धी असतील, हे स्पष्ट आहे. गतवेळी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. आगामी निवडणुकीतील पक्ष निश्‍चित झालेला नसला, तरी भाजपच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्या रिंगणात येतील, असा अंदाज आहे.

एकंदरीत बदलती राजकीय स्थिती बघता आनंद अडसूळांनी मतदारसंघाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. शासकीय विश्रामभवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पक्षातील उणिवांवर बोट ठेवत पदाधिकाऱ्यांचा चांगलाच क्‍लास घेतला. युवासेना सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत त्यांनी कान टोचले. काम दाखविल्यासच पद टिकेल, अशी तंबीसुद्धा त्यांनी दिली होती. त्यासाठी सहा महिन्यांचा काळ दिला गेलेला होता. सहामाही परीक्षेत त्यांच्या लेखी युवासेनेचे सर्वच पदाधिकारी नापास झालेत. 

निवडणुकीस उणापुरा दीड वर्षाचा काळ शेष आहे. सहा विधानसभा मतदारसंघांत बांधणी करायची आहे. नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार्ज करायचे आहे. त्यादृष्टीने फौजफाटा तयार करायचा असल्याने आनंद अडसूळ यांनी कामे करण्याला प्रारंभ केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com