अमरावती विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अमरावती - उन्हाळी 2017 परीक्षांच्या सर्व प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. परीक्षाकेंद्रांना आता सर्व शाखांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीनेच वितरित करण्याच्या सूचना परीक्षा नियंत्रकांना करण्यात आल्या आहेत. 

अमरावती - उन्हाळी 2017 परीक्षांच्या सर्व प्रश्‍नपत्रिकांची छपाई आता बंद करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. परीक्षाकेंद्रांना आता सर्व शाखांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीनेच वितरित करण्याच्या सूचना परीक्षा नियंत्रकांना करण्यात आल्या आहेत. 

एण्ड टू एण्ड प्रोग्राममध्ये आतापर्यंत केवळ तीन शाखांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन प्रक्रिया होती. विद्यापीठ परीक्षा मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. बैठकीत उन्हाळी 2017 परीक्षेपासून विद्यापीठाकडून आयोजित वाङ्‌मय, समाजविज्ञान, विज्ञान, शिक्षण व वाणिज्य या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने सर्व परीक्षा केंद्रांना परीक्षेच्या काही वेळेपूर्वी पुरविण्यात याव्या, अशा सूचना या बैठकीत परीक्षा मंडळाने केल्या आहेत. परीक्षा केंद्रांना याबाबतची तयारी करण्यासाठी विद्यापीठाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासंदर्भात परीक्षा नियंत्रकांनी कार्यवाही सुरू केलेली असून जी महाविद्यालये विद्यापीठाचे परीक्षाकेंद्र आहेत, अशांच्या प्राचार्यांना परीक्षा नियंत्रकांनी प्राचार्याचे नाव, मोबाईल व इमेल तथा अद्ययावत उपलब्ध लॅपटॉपची माहिती मागितली. 

अग्रवाल शिफारशींकडे कुलगुरूंचे लक्ष 

राज्य सरकारने परीक्षांचा दर्जा सुधारण्यासाठी राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिलेले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी पदभार सांभाळल्यानंतर राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून त्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे तेव्हा सकाळला सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केल्याचे दिसून येते. यामुळे कुलगुरूंनी घेतलेल्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.