पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्प तहानलेलेच

पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्प तहानलेलेच

यवतमाळातील १२, अमरावतीमधील ८ लघु प्रकल्प कोरडे

अमरावती - पावसाळ्यातील दुसरा महिना संपत आलेला असताना पश्‍चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र अद्याप तहानलेलेच आहे. पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने सरासरी गाठलेली नसल्याने सिंचन प्रकल्पातील जलपातळीतही समाधानकारक वाढ नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १६ टक्के साठा कमी आहे. महिन्याभरात पावसाने सरासरी न गाठल्यास आगामी दिवस कठीण राहणार आहेत. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात मात्र थोडी वाढ झाली. आतापर्यंत पश्‍चिम विदर्भात २५ टक्के जलसाठा झाला.

पश्‍चिम विदर्भात ९ मोठे, २३ मध्यम आणि ४८२ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांत १,३९९ च्या तुलनेत ४५७ दशलक्ष घनमीटर (३२ टक्के) जलसाठा झाला. गतर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्‍क्‍यांनी कमी आहे. बुलडाण्यातील पेनटाकळी व खडकपूर्णाची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. या दोन्ही प्रकल्पांत अनुक्रमे ४.६५ व ४.०३ दलघमी साठा झाला. दोन्ही प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत अनुक्रमे ३९५ व २४० मिलिमीटर पाऊस झाला. अकोला, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.

विभागातील २३ मध्यम प्रकल्पांत १७४ दलघमी जलसाठा असून, तो सरासरी २६ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो जवळपास २० टक्‍क्‍यांनी कमी आहे. अमरावतीच्या पूर्णा प्रकल्पात ७.९०, यवतमाळच्या गोकीमध्ये ४.६९, बोरगाव ०.१९, अकोल्याच्या उमामध्ये ०.१० आणि वाशीमच्या सोनल प्रकल्पात ०.१५ दलघमी साठा असून, तो चिंता वाढविणारा आहे.

बुलडाण्यातील गत पंधरवड्यात कोरडा पडलेल्या पलढगमध्ये १.८२, मसमध्ये २.८२, कोराडीत २.२०, मन ३.५३, तोरणा ०.५३ आणि उतावळी प्रकल्पात ३.४८ दलघमी आहे. या प्रकल्पांची स्थिती किंचित सुधारली.

विभागातील ४५० लघु प्रकल्पांत १६६ दलघमी जलसाठा असून, सरासरीने तो १६ टक्के आहे. यवतमाळातील लघुप्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळमधील उमर्डा, लिंगडोह, लोहवाडी, नेर, खरद, घटाणा, दुधाना, परईजारा, रामपूर, बोरडा, अडाणा व पोफळी; तर अमरावतीमधील सूर्यगंगा, जळका, अमदोरी, दाभेरी, बोलसावंगी व जमालपूर हे लघु प्रकल्प जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही कोरडेच आहेत.

विभागातील जलसाठा
मोठे प्रकल्प ९ - ४५७ दलघमी - ३२ टक्के 
मध्यम प्रकल्प २३ - १७४ दलघमी - २६ टक्के 
लघु प्रकल्प ४५० - १६६ दलघमी - १६ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com