'माफी'चा फज्जा ठरला पीककर्जाला फास 

karjmafi.jpg
karjmafi.jpg

नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्ष उलटून गेले; मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे विदर्भात कर्जमाफीचा फज्जा उडाला आहे. दुसरीकडे खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहेत. अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या फटक्‍यानंतर बॅंकांनी कर्जवाटपास सुरुवात केली आहे. 

15 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याचे सरकारने जाहीर केले होते. तरीही, लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. दरम्यान, नवा हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी नवीन कर्ज मागण्यासाठी शेतकरी बॅंकांमध्ये चकरा मारीत आहे. मात्र, जुने कर्ज माफच न झाल्याने ते फेडल्याशिवाय नवीन कर्ज देण्यास बॅंका नकार घंटा वाजवत आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदाही सावकाराच्या दारात जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. केवळ काहीच जिल्ह्यांत निम्म्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 

अमरावती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 973 शेतकऱ्यांपैकी 80 हजार शेतकरी अद्याप वंचितच आहेत. केवळ 1 लाख 18 हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. 2001 पासून ते 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जमाफीची नववी यादी नुकतीच जाहीर झाली; मात्र ती बॅंक शाखांपर्यंत अद्याप पोहोचली नाही. जिल्ह्यात 4 लाख 15 हजार 858 शेतकरी संख्या आहे. पैकी यंदा 2 लाख 46 हजार 628 शेतकऱ्यांना 1,630 कोटी रुपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. 

वर्धा : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 74 हजार 3 शेतकऱ्यांना 387 कोटी 20 लाखांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला. सरकारकडून जून 2017 मध्ये कर्जमाफी जाहीर झाली. मात्र, अद्याप काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. पीक कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी 93 हजार 551 शेतकरी पात्र ठरले होते. 

यवतमाळ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार 78 कोटी 61 लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात सोमवार (ता. 18) पर्यंत 51 हजार 963 शेतकऱ्यांना 461 कोटी म्हणजे 21 टक्के कर्जवाटप झाले. बुधवार (ता. 13) पर्यंत फक्त 377 कोटींचे कर्जवाटप होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बॅंकांवर कारवाईची धडक मोहीम राबविताच बॅंकांनी तातडीने पीककर्जाची गती वाढविली. गेल्या तीन दिवसांत 54 कोटींचे बॅंकांनी पीककर्ज वाटून रेकॉर्ड केला. ज्यांनी दीड लाखांवरील कर्ज भरले; त्यांना बॅंका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. 

भंडारा : जिल्ह्यातील 79 हजार 989 शेतकरी पात्र आहेत. आजवर 64 हजार 415 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 188 कोटी 43 लाख रुपये जमा झाले. वेळेत कर्जाचा भरणा करणाऱ्या 40 हजार 249 शेतकऱ्यांना 61 कोटी 71 लाख 84 हजार रुपये प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 56 हजार 633 शेतकऱ्यांचे 134 कोटी 26 लाख 98 हजारांचे कर्जमाफ झाले. राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकेच्या 7 हजार 782 शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. 

चंद्रपूर : जिल्ह्यात 15 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंक व ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 41 हजार 764 शेतकऱ्यांना 296 कोटी 59 लाख 61 हजार रुपयांचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले. कर्जमाफी योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मिळून जिल्ह्याला पीककर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित केले. 

गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत 2017-2018 या वर्षात एकूण 53 हजार 383 शेतकऱ्यांचे 139.84 कोटी रुपये कर्जमाफ झाले. सरकारकडून आलेल्या ग्रीन यादीनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली आहे. आजवर 60 टक्‍के कर्जमाफी झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची एकूण सभासद संख्या 92,300 इतकी आहे. 16 हजार 949 सभासदांना 59.78 कोटी नवीन कर्जवाटप करण्यात आले. 

कर्जवाटपास टाळाटाळ 
गडचिरोली जिल्ह्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटपास टाळाटाळ केली जात आहे. आजवर 25 टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. जिल्हा सहकारी बॅंकेचा 15 टक्के वाटा आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 13 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात 20 टक्के शेतकरी योजनेपासून वंचित आहे. सरकारने आदेश देऊनही कर्जाची प्रक्रिया राबविण्याकडे बॅंका दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी सावकाराच्या पाशात अडकले आहेत. 

कर्जमाफीच्या घोषणा होत असल्या; तरी प्रत्यक्षात ही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. 
- नीलेश पोटे, शेतकरी, चांदूरबाजार. 

सरकारने कर्जमाफी केली; पण त्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. बॅंकेत पीककर्जासाठी गेलो; तर अधिकारी म्हणतात, आधी जुने कर्ज भरा, त्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही. त्यामुळे सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. 
- भोलानाथ भोयर, शेतकरी, समुद्रपूर. 

पेरणी तोंडावर आल्यानंतरही बॅंकांकडून कर्जपुरवठा करण्यात शेतकऱ्यांची अडवणूक होत होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे आता परिस्थिती बदलली आहे. बॅंकेतील अधिकारी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागत आहेत. 
- सचिन काकडे, शेतकरी, बोरी अरब. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com