अडीच महिन्यांनी सानिकाला मृत्यूने गाठले

Sanika Thugavkar and Rohit
Sanika Thugavkar and Rohit

नागपूर - मैत्रीसंबंध कायम ठेवण्यासाठी नकार दिल्यामुळे मित्राने चाकूने भोसकलेल्या सानिका प्रदीप थुगावकरचा (वय २१, रा. आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर) गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेला जीवनसंघर्ष अखेर गुरुवारी थांबला. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी रोहित मनोहर हेमनानी-भोलानी (वय २२, सिंधी कॉलनी, खामला) या तिच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या १ जुलैला रात्री आठच्या सुमारास आरोपी रोहितने सानियावर आठ रस्ता चौकातील सरस्वती विनायक अपार्टमेंटमधील एका कार्यालयात धारदार चाकूने सपासप वार केले होते. यातील एक घाव सानिकाच्या किडनीवर लागला होता. 

हल्ल्यात गंभीर जखमी सानिकाला तातडीने ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेशुद्धावस्थेत असलेल्या सानिकावर डॉक्‍टरांनी शर्थीचे उपचार केले. तिच्यावर सहा शस्त्रक्रिया झाल्या होत्या. गुरुवारी दोनच्या सुमारास ‘ब्रॅडीकॉर्डिया’चा ‘अटॅक’ आल्याने तिचा मृत्यू झाला. 

नेमके काय घडले होते?
घटनेच्या दिवशी सानिका मामाच्या घरी अभ्यास करीत होती. रात्री आठ वाजता रोहित घरी आला. त्याने तिच्या मामीला सानिकाला भेटायचे असल्याचे सांगितले. मामीने नकार दिला. यानंतर बेसमेंटमध्ये असलेल्या मामाच्या कार्यालयात तो गेला. त्याने मामाला विनंती केली. त्यांनी सानिकाला घरातून कार्यालयात बोलावले. मामीसोबत सानिका खाली आली. ‘मला तुझ्याशी मैत्री कायम ठेवायची नाही,’ असे तिने रोहितला यावेळी बजावले. त्यावर चिडून रोहितने तिच्यावर चाकूने सर्वांसमक्ष सपासप वार केले.

मामाची होती लाडकी
प्रदीप थुगावकर यांची सानिका ही एकुलती एक मुलगी. प्रदीप पांडे ले-आउटमध्ये राहतात. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. सानिका लहानपणापासून मामा-मामीकडे राहत होती. मामा-मामीचे तिच्यावर प्रेम होते. ती सोमलवार कॉलेजमध्ये टेक्‍सटाइल्स पदविकेचे शिक्षण घेत होती. तिने रोहित हेमनानीसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत मामाला सर्व सांगितले होते.

बडनेऱ्यातून अटक
सानिकावर हल्ला करून रोहितने दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. त्याने बाइकवर लिफ्ट घेऊन थेट घर गाठले. घरातून पैसे घेऊन तो ऑटोने अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचला. तेथून तो मुंबईकडे असणाऱ्या नातेवाइकांकडे निघाला. कल्याणपर्यंत पोहोचल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी रोहितच्या आईवडिलांना पोलिस ठाण्यात आणले. ही बाब त्याला मित्राकडून कळाली. त्यामुळे तो पोलिसांना शरण येण्यासाठी निघाला. त्याला बडनेरा रेल्वेस्थानकावर पोलिसांनी अटक केली.

खडबडून जागा झाला होता शांत परिसर
शहरातील सर्वांत शांत असलेला परिसर म्हणून लक्ष्मीनगराची ओळख आहे. साधी चोरी वा घरफोडीची घटना या परिसरात होत नाही. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर आले होते. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवून आरोपीच्या अटकेची मागणी केली होती.

आरोपी अद्याप कारागृहात
रोहित हेमनानीला बजाजनगरचे ठाणेदार ज्ञानेश्‍वर पाटील यांनी बेड्या ठोकल्या. सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून त्याच्याकडे कोणत्याही नातेवाइकाने ढुंकूनही पाहिले नसल्याची माहिती आहे. त्याच्या जामिनासाठीही कुणी प्रयत्न न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहित आहे विक्षिप्त
रोहित आणि सानिकाची ओळख ट्यूशन क्‍लासमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघांचे मैत्रीचे संबंध होते. वर्षभरानंतर रोहित विक्षिप्तासारखा वागायला लागला. सानिकाचे अन्य मित्रांसोबत बोलणे त्याला आवडत नव्हते. फोनवरून शिवीगाळ केल्यामुळे ती त्याच्याशी बोलणे टाळत होती. त्याचा राग मनात धरून तिचा खून करण्याच्या उद्देशानेच तो मित्राची बाइक घेऊन निघाला होता.

सानिकाची आर्थिक स्थिती पाहता आम्ही ‘सहयोग ट्रस्ट’मार्फत आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. आर्थिक मदतही मिळवून दिली. जवळपास अडीच महिने सानिकाने मृत्यूशी लढा दिला. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांवर कोसळलेला दुःखाचा पहाड शब्दात व्यक्‍त करता येणार नाही. मात्र, भावना बाजूला ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा प्रयत्न राहील.
- ॲड. स्मिता सिंगलकर, सामाजिक कार्यकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com