आयुर्वेद अडकले 180 खाटांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी, रुग्ण वाढले
नागपूर - महाराष्ट्रातील 65 आयुर्वेद महाविद्यालयांपैकी नागपूरचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मध्यभारतात मोठे आहे. परंतु, पंधरा एकरात विस्तार असूनही खाटांच्या संख्येत वाढ झाली नाही. 180 खाटांवरच हे रुग्णालय अडकले आहे.

शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी, रुग्ण वाढले
नागपूर - महाराष्ट्रातील 65 आयुर्वेद महाविद्यालयांपैकी नागपूरचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मध्यभारतात मोठे आहे. परंतु, पंधरा एकरात विस्तार असूनही खाटांच्या संख्येत वाढ झाली नाही. 180 खाटांवरच हे रुग्णालय अडकले आहे.

सक्करदरा, उमरेड रोडवर हे आयुर्वेद महाविद्यालय आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात रुग्ण व विद्यार्थी संख्या वाढली. परंतु, खाटांची संख्या वाढली नाही. केंद्रशासन आयुषला बढावा देत असताना राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकिकडे "डिजिटलाईज्ड इंडिया' असे शासनाचे धोरण असताना महाविद्यालयाचा कारभार कागदावरच सुरू आहे. बीएएमएस या पदवीपूर्व वर्षाला आतापर्यंत 50 विद्यार्थी प्रवेश क्षमता होती; ती गेल्यावर्षीपासून 100 करण्यात आली. परंतु, त्या तुलनेत खाटांची संख्या कमी आहे. यामुळे आयुर्वेद चिकित्सा परिषदेकडूनही जागा कमी करण्यासंदर्भात बडगा येण्याची भीती आहे. एमडी, एमएस हे पदव्युत्तर विषय शिकवले जातात. 10 विषयांमध्ये 60 विद्यार्थी प्रवेशित आहेत. येथील बाह्यरुग्ण विभागात रोज 600 वर रुग्ण उपचारासाठी येतात.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ वर्षाला सुमारे पाच हजार रुग्ण घेतात. पंचकर्म व क्षारसूत्र या विशेष आयुर्वेद चिकित्सेचा लाभ सुमारे एक लाख रुग्ण वर्षभर घेत असतात. तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या सुवर्ण प्राशन डोस या उपक्रमाचा लाभ महिन्याला साधारणत: तीन हजार बालके घेत आहेत, तरीदेखील शासन आयुर्वेद रुग्णालयाच्या खाटा वाढविण्यासंदर्भात गंभीर नाही.

वनौषधी बागेसाठी पत्र
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या नियमाप्रमाणे साधारण पाच एकरमध्ये औषधी उद्यान आवश्‍यक आहे. परंतु, निधी आणि जागेअभावी हे उद्यान रखडले आहे. शासनाकडून या महाविद्यालयाला वनौषधी बाग तयार करण्यासंदर्भात पत्र आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात खाटांची संख्या वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना वनौषधींच्या लागवडीच्या उपक्रमातून पुस्तकी ज्ञानासोबतच वनौषधी तयार करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक थेट दाखवता येईल. वनौषधींची बाग तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, सक्करदरा.