पोट भरण्यासाठी आयुष्यभराची भटकंती

पचखेडी - मिळेल तो व्यवसाय करून पोट भरणारे बहुरूपी कुटुंब.
पचखेडी - मिळेल तो व्यवसाय करून पोट भरणारे बहुरूपी कुटुंब.

पचखेडी - देश ‘डिजिटल’ होत आहे. बहुतांश शहरे ‘स्मार्ट’ होत आहेत. प्रगतीच्या एकापेक्षा एक वाटा निवडल्या जात आहेत. आपण प्रगतीच्या मोठमोठ्या बोंबा ठोकतो. मात्र भटक्‍या समाजातील बहुरूपी समाज या सर्व झगमटापासून कोसो दूर असल्याचे वास्तव आहे. त्यावेळी एकंदर विसंगती डोळ्यापुढे येते. लाखांदूर तालुक्‍यातील तिरखुरी गावातील बहुरूपी कुटुंब पचखेडी येथे भटकंती करत नुकतेच डेरेदाखल झाले. या कुटुंबाचा संघर्ष पाहून कुणाचाही भ्रमनिरास व्हावा, असे एकंदर चित्र आहे.  

मनोहर शंकर तिवसकर यांचे हे कुटुंब. आई बेबी, पत्नी उषा, मुलगा आशीष, सून सोनू, विशाल व अर्जुन ही नातवंडे. गावाबाहेर त्यांच्या झोपडीवर प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपली कैफियत मांडली. बहुरूपी समाज मनोरंजन करून त्या बदल्यात भीक मागून पोट भरतो. हाच आमचा परंपरागत व्यवसाय. मात्र अलीकडच्या काळात लोकांनी आम्हाला भीक देणे बंद केले. तू जवान आहेस, धडधाकट आहे,  काम करायचा नेट लागते...म्हणून भीक मागतो, असे टोमणे मारले जातात. तेव्हा आम्ही पोट भरण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याकडून ड्रम व खाट उधार आणून अल्प मोबदल्यात विकून कसाबसा उदरनिर्वाह करतो. त्यातही भागत नसल्याने भटकंती करीत असतो. कधी कधी कोंबड्या पाळतो. आता तर कोंबड्याही आमच्या घरच्या सदस्य झाल्यात. 

लेकराले शिकवून मोठ्‌ठं करण्याचं स्वप्नं पाहतो. तीन महिने गावात झोपडी टाकून राहतो. बाकी वर्षभर पोटासाठी मिळेल तो धंदा करत भटकतो. म्हणून आमच्या पोरायनं शाळाच बघितली नाही. हक्काचं राहायला घर नाही. शाळा तरी कुठून शिकवायची जी? कुठे शिकवायची? लीडर लोकांनी मतं घ्यासाठी इलेक्‍शन कार्ड बनवून दिले. मात्र अजूनही आमच्याकडे साधे रेशनकार्ड नाही. सरकार गरिबांचा वाली आहे म्हणते, तं आम्ही का श्रीमंत आहोत का? असा प्रश्न मनोहर तिवसकर उपस्थित करतात. आपल्या देशात कोणीही घरापासून वंचित राहणार नाही, असे आश्‍वासन दिले जाते. बहुरूपी समाज आयुष्यभर घरापासून वंचित आहे. मंग तो विदेशातील हाये का? असा प्रश्न बहुरूपी भटक्‍या समाजातील लोकांना पडल्यावाचून राहत नाही.

आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मालकच माल आणून देतो. आम्हाला थोडेसे कमिशन देतो. शासनाने आम्हाला आर्थिक मदत केली तर आम्ही स्वतःचा व्यवसाय करून प्रगती करू शकतो.
- मनोहर तिवसकर, बहुरूपी समाजबांधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com