बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द घडली आहे. त्यामुळे पवारसाहेबांबाबत बाळासाहेब जे काही बोलले ते खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अॅड. आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी गावंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना बाळासाहेबांचे व्यक्तव्य कसे खोटे याची उदाहरणेच दिली. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी कधीच मला मदत केली नाही, असा आरोप बाळासाहेब करीत असलेतरी त्यांची राजकीय कारकिर्दच पवारसाहेबांमुळे घडल्याचा दावा गावंडे यांनी केला.

1998 च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून लढताना महाराष्ट्रातील चार दलित नेत्यांना खासदार म्हणून निवडून आणण्यात पवारसाहेबांची भूमिका महत्त्वाची होती, असे गावंडे यांनी सांगितले. 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ.संतोषकुमार कोरपे उभे होते. त्यामुळे मदत करण्याचा प्रश्‍नच उरत नाही. त्या निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेबांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले होते. मात्र शरद पवार, अजित पवार, आबा पाटील यांनी जिल्हा परिषदेत वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे बाळासाहेबांची राजकीय कारकिर्द टिकून आहे. आता बाळासाहेब मोठे नेते झाले आहेत. त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आणि शरद पवारांसोबत एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही गावंडे यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, प्रदेश महासचिव विश्‍वानाथ कांबेळ, प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशा मिरगे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, भाऊराव सुरळकर, माजी महासचिव श्रीकांत पिसे पाटील, दिलीप आसरे आदींची उपस्थिती होती. 

पवारसाहेबांमुळेच मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर 

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. जातपात, धर्म न मानणाऱ्या या नेत्याने लहान-लहान घटकांना सोबत घेऊन त्यांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सांगितले. 

ओवेसींसोबत बसल्याने फायदा कुणाचा? 

महिला सक्षमीकरण, धर्मनिरपेक्षता, सर्वांना समान माणून सोबत घेवून चालणारे नेते म्हणून शरद पवारांची अोळख आहे. त्या नेत्यावर आरोप करताना अॅड. बाळासाहेब आंबेडकर एमआयएमला जवळ करतात, आेवेसींना सोबत घेऊन बसतात, यात कुठली धर्मनिरपेक्षता आली? आेवेसींना सोबत घेल्याने कुणाचा फायदा होणार आहे? हे बाळासाहेबांना कळत नाही का? कळत असेल तर ते अप्रत्यक्ष कुणाला मदत करीत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशा मिरगे यांनी उपस्थित केला. 

‘आंबेडकर पडले तर याद राखा...’ 

माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी 1998 च्या निवडणुकीतील एक प्रसंग पत्रकार परिषदेत सांगितला. त्यावेळी अकोल्यात काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारासाठी अकोला क्रिकेट क्लबवर आयोजित प्रचास सभेला शरद पवारांची उपस्थिती होती. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नेत्यांमध्ये बिडकरही होते. त्यावेळचा एक प्रसंग सांगताना बिडकर म्हणाले, ‘पवारसाहेब एसीसीवर पोचताच ‘काँग्रेसने सुरू केलेल्या सामाजिक अभिसरणाच्या वातावरणात अॅड. आंबेडकर पडले तर पुन्हा मला भेटण्यासाठी यायचे नाही, अशा शब्दांत पवारांनी स्वागतासाठी उभ्या काँग्रेस नेत्यांना दम भरला होता. ते शब्द आजही जसेच्या तसे आठवतात. ही बाळासाहेबांना केलेले मदत नाही तर आणखी काय, असा प्रश्‍न बिडकर यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com