युवकांनो, पोलिस विभागात भरती व्हा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर - नागपूर पोलिस विभागात लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. युवकांनी करिअरच्या दृष्टिकोनातून पोलिस विभागात भरती होण्याचे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी पत्रपरिषदेत केले. मंगळवारी सायंकाळी आयुक्‍तालयात ‘भरोसा सेल’ची कामगिरी आणि पोलिस भरतीविषयक माहिती त्यांनी दिली.

नागपूर - नागपूर पोलिस विभागात लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. युवकांनी करिअरच्या दृष्टिकोनातून पोलिस विभागात भरती होण्याचे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी पत्रपरिषदेत केले. मंगळवारी सायंकाळी आयुक्‍तालयात ‘भरोसा सेल’ची कामगिरी आणि पोलिस भरतीविषयक माहिती त्यांनी दिली.

नागपूर पोलिस विभागात २४० पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ मार्च असून, ऑनलाइन अर्ज उमेदवारांना भरता येईल. पोलिस विभागात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मान-सन्मानासोबत चांगले वेतन आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. सध्या पोलिस विभाग स्मार्ट होत असून, टेक्‍नोसॅव्ही पोलिस कर्मचारी तयार करण्यात येत आहेत. उच्च शिक्षित युवक-युवतींसाठी चांगली संधी चालून आली आहे. अंगात वर्दी आणि देशसेवा-समाजसेवेचे व्रत जोपासण्यासाठी पोलिस विभागातील नोकरी युवकांना खुणावत असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.  युवा वर्ग पोलिस विभागाकडे आकर्षित व्हावा, यासाठी विविध महाविद्यालयांत कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांमुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी नियंत्रण होण्यास मदत होईल. पोलिसांना चांगले वेतन, निवासाची सोय, सब्सेडरी कॅन्टीन, आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा, कमी व्याजदरात कर्ज इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.

‘भरोसा’मुळे पीडित महिलांना मदत
अनेक महिलांना पोलिस, ठाणे आणि पोलिसांच्या चौकशीची भीती वाटते. मात्र, ‘भरोसा सेल’मुळे पीडित महिलांना सर्वच प्रकारची मदत पोलिस अगदी घरच्या वातावरणात करतात. भरोसा सेलच्या कार्यामुळे समाधानी असल्याचे आयुक्‍त डॉ. वेंकटेशम म्हणाले. पीडित महिलांसोबत वृद्ध, असहाय मुले आणि पुरुषांच्या महिलांविषयक तक्रारीसुद्धा येथे ऐकल्या जातात. एकाच छताखाली मार्गदर्शन, आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, विधिसेवा आणि पोलिसांचे समुपदेशन दिले जाते. येथे अशिक्षित महिलांपासून उच्चशिक्षित महिलांपर्यंतच्या तक्रारी आल्या आणि त्यावर समाधानही शोधल्या गेल्याचे आयुक्‍त म्हणाले.