भीम-आधार योजना ठरणार ‘गेम चेंजर’ - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू केलेली भीम-आधार योजना जगात ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता  राज्य सरकारची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य आघाडीवर राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. 

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू केलेली भीम-आधार योजना जगात ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता  राज्य सरकारची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीत राज्य आघाडीवर राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. 

डिजिधन योजनेच्या प्रसारासाठी आयोजित शंभराव्या व शेवटचा मेळावा पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपुरातील मानकापूर क्रीडासंकुलात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, गेल्या ६५ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक चिंतनावर केवळ चर्चाच झाली. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविले. भीम आधार योजना ही जगाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी पर्याय ठरेल. या ॲपमुळे आर्थिक परिवर्तन होणार असून, व्यवहारात पारदर्शकता येईल.

डिजिधन योजनेच्या मेळाव्याचा हा समारोप नाही तर केंद्राने पेटवलेली मशाल आता राज्य शासनाकडे सोपविली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची जबाबदारी वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. केंद्राच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने तयारी केली असून, १५ मेपर्यंत १५ हजार गावे डिजिटल होणार आहेत. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा यातून मिळतील. डिसेंबर २०१८ पर्यंत  प्रत्येक गावात फायबर ऑप्टिक पोहोचणार आहे. दहा हजार ग्रामपंचायतींना पॉस मशीन देण्यात आले असून, १ हजार गावांना आधार जोडणी असलेली व्यवस्था महिनाभरात पोहोचणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना यावेळी सांगितले. 

ट्रिपल आयटी, आयआयएम, एम्ससारख्या संस्था देऊन नागपूरला मानव संसाधन हब तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यात ४२ हजार घरे बांधकामाला सुरुवात झाली असून, प्रत्येक तीन महिन्यांनी  या घरांची संख्या वाढविणार आहे. गावांमध्ये अडीच लाख घरांचे काम सुरू केल्याचे नमूद  करीत पंतप्रधानांचे प्रत्येकाला घराचे स्वप्न राज्य सरकार पूर्ण करणार असल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Web Title: bhim aadhar yojana game changer