हिरव्या आच्छादनामुळे वाढला पक्ष्यांचा गुंजारव

File photo
File photo

नागपूर : मेट्रो, मिहानसह मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असलेल्या उपराजधानीत दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत आहे. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या धंतोली, धरमपेठ, रामदासपेठ, सीताबर्डी आदी भागतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील गोकुळपेठ परिसरात वृक्षांची दाटी आहे. या वृक्षांवर विविध प्रजातींच्या पक्षांची रेलचेल दिसून येते. शहरात कुठेही न दिसणारे पक्षी या भागात आले कुठून, असा प्रश्‍न येणाऱ्या-जाणाऱ्यांना नक्कीच पडतो. परंतु, ही किमया साधली आहे निसर्गमित्र ऋतुध्वज देशपांडे यांनी.
1973 साली नागपुरात आल्यावर येथील काहिलीने त्रस्त होऊन प्रतापनगर, सिव्हिल लाइन्स, गोकुळपेठ, रामनगर परिसरात हिरवळ फुलविण्याचा निश्‍चय देशपांडे यांनी केला. केवळ झाडे लावून ते थांबले नाही तर स्वत: खर्च करून त्याभोवती ट्री गार्डही लावले. मुलासह गाडीवर जाऊन त्या झाडांना खतपाणी घालून जपले, जगवले. आज हा परिसर हिरवाईने नटला आहे. या परिसरात पक्ष्यांसाठी आरक्षित प्रदेश असा फलकही देशपांडे यांनी लावला आहे. इसासनी परिसरातील राय टाऊनमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून तेथील झाडे जगवली. शाळा, महाविद्यालये एवढेच नव्हे तर झोपडपट्टयांमध्ये त्यांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले.
वृक्षसंवर्धनाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले. आईकडून लहानपणी "मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपेण: अमृतो शिवरूपाय, वृक्षराजायते नम:' अशी वटवृक्षाची महती ऐकून त्यांच्या मनात वृक्षांबद्दल आवड निर्माण झाली. कालांतराने ही आवड वाढत गेली. वृक्ष, निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्या सहवासात रमणाऱ्या देशपांडे यांना वृक्षाचा लळाच लागला. शहरातील बऱ्याच भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून प्रदूषण कमी करण्याचा देशपांडे यांचा प्रयत्न आहे. या कामासाठी त्यांना माजी न्यायमूर्ती सिरपूरकर, डॉ. अविनाश जोशी, श्रीमंत सुधीर बुटी, पुण्याचे पोलिस आयुक्‍त दिवाण यांचे आर्थिक सहकार्य लाभते.
गोकुळपेठ परिसराचे पालकत्व
देशपांडे यांच्या कार्याची दखल घेऊन महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी गोकुळपेठ परिसराचे पालकत्व त्यांना बहाल केले. परिसरातील वृक्षारोपणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. नागरिकांना वृक्षाची महती पटवून देऊन वृक्ष दत्तक योजनेतून त्यांनी तब्बल 121 झाडे जगवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com