EVM प्रकरण : भाजपची काॅंग्रेस नेत्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

काँग्रेसने हा खोटा प्रचार न थांबविल्यास या काँग्रेस नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील, असा इशारा अॅड. तिवारी यांनी दिला आहे. 

यवतमाळ : इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (इव्हीएम) घोळ करून भारतीय जनता पक्षाने विजय संपादन केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपच्या वतीने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. तज्ज्ञ विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आणि अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत भाजपला आश्चर्यकारक विजय मिळाला. सत्ता आणि पैशाचा वापर करून हे यश भाजपला मिळाले आहे. तसेच, भाजपने सत्तेचा गैरवापर करून EVM यंत्रांमध्ये फेरफार करून गैरमार्गाने त्यांच्या पक्षाला मते मिळवली, असे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. 

प्रामुख्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने मते मिळवली असा आरोप करण्यात येत आहे. राज्यात काही ठिकाणी सत्ताधारी भाजपविरोधात निदर्शने करून, मोर्चे काढून फेरनिवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात भाजपकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधि आघाडीचे अध्यक्ष विनोद तिवारी यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाल्याचे या नोटिशीमध्ये त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने हा खोटा प्रचार न थांबविल्यास या काँग्रेस नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील, असा इशारा अॅड. तिवारी यांनी दिला आहे.