पंचायत समित्यांवरही भाजपचा वरचष्मा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा फडकावला. काँग्रेस २२ ठिकाणी सत्ता मिळविण्यात यशस्वी झाली. तर, शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून ९ ठिकाणी सत्ता स्थापन केली.

विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा फडकावला. काँग्रेस २२ ठिकाणी सत्ता मिळविण्यात यशस्वी झाली. तर, शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून ९ ठिकाणी सत्ता स्थापन केली.

यवतमाळ - जिल्ह्यातील १६ पैकी सहा पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला. पाच पंचायत समित्या काँग्रेसकडे, चार भाजप, तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. यवतमाळ, नेर, दारव्हा, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा या पंचायत समित्या सेनेच्या ताब्यात आहेत. बाभूळगाव, वणी, घाटंजी, झरी पंचायत समित्यांत भाजप तर राळेगाव, महागाव, मारेगाव, कळंब, आर्णी या पंचायत समित्या काँग्रेसकडे आहेत.

एकमेव पुसद पंचायत समिती राष्ट्रवादीकडे कायम आहे. जिल्ह्यातील सर्व सभापती व उपसभापतींच्या निवडीची सभा सोळाही ठिकाणी झाली. अनेक ठिकाणी बहुमत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी इतर पक्षांच्या मनधरणीसाठी मोर्चेबांधणी केली होती. पुसद व उमरखेडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना युती झाली. शिवसेनेला रोखण्यासाठी दिग्रस, आर्णी व झरी पंचायत समित्यांत भाजप-काँग्रेसची युती पाहावयास मिळाली.

महागावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी, मारेगाव काँग्रेस-शिवसेना अशी युती झाली.
चंद्रपूर - जिल्ह्यातील पंधरापैकी अकरा पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहिले. चार पंचायत समित्यांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सावली येथे ईश्‍वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. चंद्रपूर, मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिंपरी, जिवती, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि सावली येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. नागभीड, राजुरा, कोरपना आणि चिमूर येथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सावली येथे भाजप आणि काँग्रेसचे समान उमेदवार निवडून आल्याने तेथे ईश्‍वरचिठ्ठीने निकाल जाहीर करण्यात आला. 

गडचिरोली - पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत १२ पैकी सर्वाधिक ५ पंचायत समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. तर, भाजपला ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ व आविस आणि ग्रामसभांना प्रत्येकी एका पंचायत समितीवर सत्ता मिळविता आली. १२ पैकी गडचिरोली, कोरची, कुरखेडा, आरमोरी व मुलचेरा पंचायत समित्यांवर काँग्रेसने सत्ता मिळविली. देसाईगंज, धानोरा, चामोर्शी या तीन पंचायत समित्यांवर सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. सिरोंचा व एटापल्ली पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवल्या. अहेरी पंचायत समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाने झेंडा रोवला. भामरागड पंचायत समितीवर ग्रामसभांच्या सदस्यांनी ताबा मिळविला.

बुलडाणा - जिल्ह्यातील १३ पैकी ४ पंचायत समित्यांवर भाजपने झेंडा फडकावला. तर, चार ठिकाणी काँग्रेस, शिवसेना दोन व शेगाव पंचायत समितीवर भारिप-बमसंने सत्ता स्थापन केली.

अमरावती - जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक चार जागा मिळाल्या. तर, भाजपला दोन पंचायत समित्यांवर आपली सत्ता स्थापन करण्यात आली. चिखलदरा, नांदगाव खंडेश्‍वर, वरुड, अमरावती या पंचायत समित्यांवर सभापतिपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे, यातील नांदगाव खंडेश्‍वर पंचायत समितीत काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली. मोर्शी व अंजनगावसुर्जी येथे भाजपची सत्ता आली. या दोनही ठिकाणी भाजपला बहुमत होते. चांदूरबाजारमध्ये प्रहारचे सर्वाधिक सहा सदस्य असताना अपक्ष व दर्यापूर येथे काँग्रेसचे सर्वाधिक चार सदस्य असतानाही अपक्षांची सत्ता आली. अचलपुरात राष्ट्रवादीचा एकमेव सदस्य असताना काँग्रेस व प्रहारच्या मदतीने सत्ता मिळविता आली. तर, भातकुली पंचायत समितीवर भाजप व काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेची सत्ता आली.

वर्धा - जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांचे सभापतिपद व सहा उपसभापतिपदांवर भाजपने वर्चस्व सिद्ध केल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. सेलू येथे ईश्‍वरचिठ्ठीने काँग्रेसला उपसभापतिपद मिळाले. तर, वर्धा पंचायत समितीत भाजपच्या पाच सदस्यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस समर्थित उमेदवाराची उपसभापतिपदावर वर्णी लागली.

Web Title: bjp on panchyat committee