भाजपचे नगरसेवक सेनेच्या गळाला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

नागपूर : भाजपमधील बंडखोरांवर सुरुवातीपासून नजर राखून ठेवलेल्या शिवसेनेच्या गळाला शेवटच्या दिवशी भाजपचे आजी, माजी नगरसेवक लागले. नगरसेवक अनिल धावडे, नगरसेविका अनिता वानखेडे, नगरसेविका विशाखा मैंद यांचे पती माजी नगरसेवक बाबा मैंद व भाजपच्या विशाखा जोशी यांना भाजपने उमेदवारी नाकारताच शिवसेनेने ए व बी फॉर्म देऊन त्यांना निवडणूक रिंगणात आणले. 

नागपूर : भाजपमधील बंडखोरांवर सुरुवातीपासून नजर राखून ठेवलेल्या शिवसेनेच्या गळाला शेवटच्या दिवशी भाजपचे आजी, माजी नगरसेवक लागले. नगरसेवक अनिल धावडे, नगरसेविका अनिता वानखेडे, नगरसेविका विशाखा मैंद यांचे पती माजी नगरसेवक बाबा मैंद व भाजपच्या विशाखा जोशी यांना भाजपने उमेदवारी नाकारताच शिवसेनेने ए व बी फॉर्म देऊन त्यांना निवडणूक रिंगणात आणले. 

भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शहरात जल्लोष करणाऱ्या शिवसेनेने आज त्यांच्याच आजी, माजी नगरसेवकांना उमेदवारी देऊन पुन्हा भाजपले डिवचले. प्रभाग 22 मधून भाजपने उमेदवारी नाकारलेले अनिल धवड यांना आधीच उमेदवारी भेटणार नसल्याची कुणकूण लागली होती. ते कॉंग्रेसच्या संपर्कातही होते. मात्र, शिवसेनेने अनिल धावडे यांच्याशी संपर्क साधून या प्रभागातील एका मातब्बराला गाठले. त्यांना 22 मधून उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या नगरसेविका अनिता वानखेडे यांना प्रभाग 22 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपच्या नगरसेविका विशाखा मैंद यांचे पती व माजी नगरसेवक बाबा मैंद यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय भाजपच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या विशाखा जोशी यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिली. विशाखा जोशी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. पी. जोशी यांच्या पत्नी असून संघाचे प्रचारक रवींद्र जोशी यांच्या नातेवाईक आहेत. याशिवाय प्रभाग 24 मधून शिवसेनेने नगरसेवक जगतराम सिन्हा यांना कायम ठेवत जिल्हा उपप्रमुख रविनीश पांडे यांच्या पत्नी सीमा, श्‍वेता बानाईत व नगरसेविका अनिता वानखेडे यांना उमेदवारी दिली. प्रभाग 25 मधून गुड्डू ऊर्फ यशवंत रहांगडाले, प्रमोद मोटघरे, वंदना मेश्राम, गुणवंताबाई यांना तर प्रभाग 4 मधून बंडू तळवेकर, उद्योगपती किशोर रॉय, सरिता मस्के, स्नेहा मंडपे, प्रभाग 21 मधून नगरसेविका अलका दलाल, रमेश इंगळे, शरद सरोदे, प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया यांना उमेदवारी दिली. 

मुख्यमंत्र्यांना धक्का 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग 15 मधून भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली. माजी नगरसेवक बाबा मैंद व विशाखा जोशी हे भाजपचे विश्‍वासू होते. त्यांनी येथून बंडखोरी करीत मुख्यमंत्र्यांना धक्का दिला.

Web Title: BJP Shiv Sena Nagpur Municipal Corporation election