बीटी बियाण्यांची आंध्रातून तस्करी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नागपूर - मौदा तालुक्‍यात अनधिकृतपणे बीटी बियाण्याची विक्री करताना एका कंपनीच्या विक्री एजंटला कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता. ४) पकडले. दरम्यान, आंध्र प्रदेशातून या बीटी-बियाण्याची तस्करी विदर्भात करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर - मौदा तालुक्‍यात अनधिकृतपणे बीटी बियाण्याची विक्री करताना एका कंपनीच्या विक्री एजंटला कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता. ४) पकडले. दरम्यान, आंध्र प्रदेशातून या बीटी-बियाण्याची तस्करी विदर्भात करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वी  बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आल्याची माहिती आहे. या बियाण्यांमध्ये सर्वाधिक कापसाच्या बियाण्यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील बियाणे निर्मिती कंपनीने विक्री  करण्यासाठी कृषी विभागाची परवानगी घेतलेली नाही. प्रमाणित बियाणे असल्याचे प्रमाणपत्र घेतलेले नाही. मार्च-एप्रिल या महिन्यात या कंपन्यानी नागपूरच्या सीमावर्तीत भागात गोदामे भाड्याने घेऊन बीटी बियाण्यांचा साठा आणून ठेवल्याची माहिती आहे. काही कंपन्यानी गोदामे भाड्याने घेऊन अनधिकृत बीटी-बियाण्यांची तस्करी विदर्भात सुरू केल्याची माहिती आहे. मौदा तालुक्‍यात पकडलेल्या अनधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना बरीच गुप्त माहिती हाती लागली. बीटी-बियाण्यांच्या पाकिटाची पॅकिंग अधिकृत बीटी बियाण्यासारखीच केली असून, ४०० ग्रॅमच्या पाकिटाचा दर ८०० रुपये आहे. कंपनी विक्रेत्यांना या बियाण्यांची पाकिटे चारशे ते पाचशे रुपयांत उपलब्ध करून देते. एका पाकीटमागे विक्रेत्यांना तीनशे रुपये मिळत असल्याने तेदेखील याची सर्रासपणे विक्री करतात. आंध्र प्रदेशातील काही बोगस  कंपन्यानी दोन महिन्यांपूर्वीच १ लाखावर पाकिटांची विदर्भात तस्करी केल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषी विभागाने बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे व त्याचे अधिकृत देयके घेण्याचे आवाहन केले आहे. 

बीटी-बियाण्यात तणनाशकाचा वापर
आंध्र प्रदेशातून तस्करी केलेल्या अनधिकृत बी.टी. बियाण्यांमध्ये तणनाशकाचे द्रावण लावले आहे. तणनाशकात काही विषारी घटक आहेत. शिवाय त्याचा जमिनीवरदेखील त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे बियाण्यांना तणनाशकाचे द्रावण लावून विकण्यास मनाई आहे

नमुने प्रयोगशाळेत
मौदा येथील विक्री एजंटकडून अनधिकृत बीटी बियाण्याचे ५२ पाकिटे जप्त करण्यात आली.  नमुने कृषी विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आठ ते दहा दिवसांत येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तपासाकडे लक्ष
आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बोगस बीटी बियाण्यांची तस्करी केली जात आहे. याप्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने मौदा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिस तपासात काय हाती लागते, याकडेदेखील लक्ष लागले आहे.

Web Title: bt seed in andhra pradesh smuggling