नखाच्या कलेतून साकारली तांदुळाएवढी सर्वांत लहान चित्रकृती

विरेंद्रसिंह राजपूत
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

  • जगातील नखाद्वारे काढलेल्या सर्वात लहान चित्रकृतीचा केला दावा.
  • गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद साठीही प्रयत्न करणार.

नांदुरा (बुलडाणा) : ग्रामीण भागातील अनेक तरुणात नानाविध प्रकारच्या कला दडलेल्या असल्या तरी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळत नसल्याने त्यांच्या कलाकारीला पाहिजे ती दाद कधीच मिळत नाही. असे असतानाही अंगी असलेल्या कलेची जोपासना व्हावी याकरिता नांदुरा तालुक्यातील छोट्याशा निमगाव येथील सोपान वासुदेव खंडागळे या युवा चित्रकाराने कोणत्याही ब्रशचा वापर न करता आपल्या बोटाच्या नखातून तांदुळाच्या आकाराची सर्वात लहान चित्रकृती साकारून सर्व चित्रकला जगताला अचंबित करत एक वेगळा इतिहास रचला आहे. त्यांची ही नखाद्वारे साकारलेली चित्रकृती ही जगातील सर्वात लहान चित्रकृती असल्याचा दावा या चित्रकाराने केला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सोपान खंडागळे या युवा चित्रकाराने खडतर परिस्थितीत स्वबळावर मोलमजुरी करत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नाईक चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे धडे गिरविले. मात्र हलाखीची परिस्थिती असल्याने चित्रकलेचा अर्ध्यावर डाव मोडीत त्यांनी गुजरातमधील सुरत शहरात टेक्सटाईल पार्कमध्ये पोटाची खडगी भरण्यासाठी एका खाजगी  कंपनीत नोकरी पत्करली. परंतु त्यांचे अंगी असलेल्या चित्रकारीने तेथेही त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. वेगळे काही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगून असल्याने व सुरुवातीच्या शैक्षणिक काळापासून त्यांना नखाने चित्र काढण्याचा छंद असल्यामुळे या क्षेत्रात उभारी देण्याचा चंग त्यांनी बांधला.

कागद आणि रंग याशिवाय कोणत्याही साधनांचा या प्रकारात वापर होत नसल्याने नखाच्या या दुर्लभ चित्र प्रकारात टिंगलटवाळी सुध्दा होत गेली. परंतु सोपान खंडागळे या युवा चित्रकाराने या चित्रप्रकारात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करीत आपल्या अंगी असलेली कला कष्टाने जोपासली व तिची आराधना करीत नखाच्या साहाय्याने वेगवेगळ्या विषयावरील अनेक चित्रकृती तयार केल्या. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर जगावेगळी अशी लहानात लहान तांदुळाच्या आकाराचे चित्र तयार करून हे चित्र जगातील नखाद्वारे काढलेले सर्वात लहान चित्र असल्याचाही त्यांनी दावा करत चित्रकलेच्या विश्वात खडबळ उडवून दिली आहे. सोबतच त्यांनी नखाद्वारे काढलेल्या चित्रकृतीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद व्हावी ही पण अपेक्षा व्यक्त केली आहे. एकंदरीत मनाची जिद्द व जगावेगळे काहीतरी करण्याची मनीषा तुमच्या अंगी असली म्हणजे यश तुमच्या चरणी लोटांगण घेऊ शकते हेच जणू या कलाकाराने आपल्या कर्तबगारीतून दाखवून दिले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स