सावकाराच्या जाचाला कंटाळून तिघांचे विषप्राशन

श्रीधर ढगे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पैशाची दर महिन्याला परतफेड केल्यानंतरही आरोपी हे फिर्यादी देवेंद्र व त्याचा भाऊ नरेंद्र आणि वडील श्रीराम जामोदे यांना आणखी पैशाची मागणी करीत शिवीगाळ करुन धमक्या देत होते.

खामगाव (बुलडाणा) : खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून येथील जोहार्ले ले-आऊटमधील जामोदे कुटूंबातील तिघा पितापुत्रांनी विषप्राशन केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यामध्ये नरेंद्र जामोदे याचा अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सावकारी कायद्यानुसार सौ. निर्मला राजेंद्र कबाडे रा.वाडी व प्रकाश रामकृष्ण गावंडे रा. मोहन चौक या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

या संदर्भात येथील कोर्टासमोरील पानटपरी चालक देवेंद्र श्रीराम जामोदे रा. जोहार्लेे ले-आऊट याने शहर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने आरोपी सौ. निर्मला राजेंद्र कबाडे रा. वाडी व प्रकाश रामकृष्ण गावंडे (रा. मोहन चौक) यांच्याकडुन खाजगी कामासाठी गेल्या दिड-दोन वर्षापुर्वी व्याजाने 4 लाख रुपये घेतले होते. या पैशाची दर महिन्याला परतफेड केल्यानंतरही आरोपी हे फिर्यादी देवेंद्र व त्याचा भाऊ नरेंद्र आणि वडील श्रीराम जामोदे यांना आणखी पैशाची मागणी करीत शिवीगाळ करुन धमक्या देत होते. ऐवढेच नव्हे तर आरोपी प्रकाश गावंडे याने त्याची पानटपरी नोटरी करुन ताब्यात घेतली.  आरोपींच्या त्रासाला कंटाळुन देवेंद्र त्याचा भाऊ नरेंद्र व वडील यांनी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जोहार्ले ले-आऊट स्थित निवासस्थानी विषप्राशन केले. घटनेनंतर तिघांनाही येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.परंतु तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुध्द कलम 32, 33 सावकारी अधिनियम 1946 सहकलम 39 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014, कलम 504, 506 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नरेंद्रच्या मृत्यूमुळे गुन्ह्यात आणखी कलमांचा समावेश होणार असल्याचे समजते. 

जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मिणा, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोस्टेचे कर्मचारी सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत.