पुस्तक द्यावे-पुस्तक न्यावे : अनोखी वाचन चळवळ

श्रीधर ढगे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुस्तकांना फुटले पंख
ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम लवकरच सर्व महाराष्ट्रात योजना विस्ताराचा मानस आहे.वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम असून घरात पडलेली पुस्तके बदलून घेतली तर ती इतरांच्या वाचनात येतील. या उपक्रमाने एक प्रकारे पुस्तकांना पंख फुटले आहेत.चांगली दर्जेदार पुस्तके वाचनाची ही चळवळ ग्रामीण भागात सुद्धा राबविण्यात येणार आहे.
- विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक

खामगाव : राज्यातील मोठी वाचन चळवळ म्हणून संबोधल्या जाणारा ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील 'पुस्तक घ्यावे , पुस्तक द्यावे,अखंड वाचत जावे' हा उपक्रम खामगावमध्ये राबविला जाणार आहे.शनिवारी (ता.28)संध्याकाळी पाच वाजता येथील टिळक स्मारक मंदिरात या उपक्रमाचा शुभारंभ होईल.

खामगाव व परिसरातील वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि टिळक स्मारक महिला मंडळ यांच्या पुढाकाराने ग्रंथ आपल्या दारी या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आहे.

पुस्तक घ्यावे ! पुस्तक द्यावे !!
अखंड वाचीत जावे... असा हा आगळा वेगळा उपक्रम शनिवारी (ता. 28) संध्याकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत आणि रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते रात्री 8 वाजता पर्यंत टिळक स्मारक मध्ये आयोजित करण्यात आला आहे.ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील हा एक अनोखा उपक्रम  असून वाचकांनी  त्याला आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे आणि आपल्या जवळील एक पुस्तक देऊन जायचे आहे.येथे वाचून झालेली जास्तीत जास्त पुस्तकं बदलून घेता येतील. सुस्थितीतील दर्जेदार मराठी, इंग्रजी, बालसाहित्य अशी कितीही पुस्तकं आपण आणू शकता.मात्र शैक्षणिक पुस्तक, धार्मिक ग्रंथ, मासिक, गौरवग्रंथ स्वीकारले जाणार नाहीत.या उपक्रमात सहभागी होवून वाचन चळवळच्या विधायक कार्यात हातभार लावावा असे आवाहन विनायक रानडे, सुषमा भाटे, श्वेता तारे तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि टिळक स्मारक महिला मंडळ यांनी केले आहे.

*राज्यात 23 शहरात प्रतिसाद
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील या उपक्रमास वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ फेब्रुवारी 2017 मध्ये करण्यात आला. महाराष्ट्रात 23 ठिकाणी योजनेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नाशिक, नाशिकरोड, संगमनेर, पुणे, कराड, कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, कल्याण, ठाणे, मुलुंड, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले, अहमदनगर, लोणी येथे हा उपक्रम राबविण्यात आला.त्यात 12 हजार वाचकांनी सहभाग घेतला तर 22 हजार 500 पुस्तकांची अदलाबदल झाली.

पुस्तकांना फुटले पंख
ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम लवकरच सर्व महाराष्ट्रात योजना विस्ताराचा मानस आहे.वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम असून घरात पडलेली पुस्तके बदलून घेतली तर ती इतरांच्या वाचनात येतील. या उपक्रमाने एक प्रकारे पुस्तकांना पंख फुटले आहेत.चांगली दर्जेदार पुस्तके वाचनाची ही चळवळ ग्रामीण भागात सुद्धा राबविण्यात येणार आहे.
- विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक