बुलडाणा: कपाशी पिकावर लाल्यासदृश रोगाचा प्रादुर्भाव

विरेंद्रसिंह राजपूत
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सध्या या परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला या पावसामुळे तरी काही प्रमाणात थ्रीप्स व फुलकिडे नियंत्रणात आली आहेत. या तालुक्यातील शेतकरी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतो. मात्र त्यासाठी या पिकाची काळजी घेण्यास कोणतीही कमतरता ठेवत नाही. भरमसाठ खर्च करून हे उत्पादन घेतले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी सद्या मेटाकुटीस आला आहे. आज रोजी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या सदृश रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने लाल होत असून ती करपत आहेत.

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य असून दर्जेदार कापसामुळे या परिसराला संपूर्ण विदर्भात एक वेगळी ओळख मिळाली आहे. कॉटन बेल्ट म्हणून प्रसिध्द असलेल्या या भागातील लांब धाग्याच्या कापसामुळे भावातही नेहमी तेजी राहत असते.या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने कपाशीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र नंतर ठराविक कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने या पिकाची पाहिजे ती वाढ होऊ शकली नाही. त्यातच सुरवातीला मावा व तुडतुडयांनी हल्लाबोल केल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधीने घायळ केले. त्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच थ्रीप्स व फुलकिड्याचे कपाशी पिकावर आक्रमण झाले. त्यासाठीही वेगवेगळ्या शिफारस केलेल्या औषधीचा फवारा करूनही त्यातूनही पाहिजे ते रिझल्ट मिळाले नाही.

सध्या या परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला या पावसामुळे तरी काही प्रमाणात थ्रीप्स व फुलकिडे नियंत्रणात आली आहेत. या तालुक्यातील शेतकरी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतो. मात्र त्यासाठी या पिकाची काळजी घेण्यास कोणतीही कमतरता ठेवत नाही. भरमसाठ खर्च करून हे उत्पादन घेतले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी सद्या मेटाकुटीस आला आहे. आज रोजी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या सदृश रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने लाल होत असून ती करपत आहेत.

या तालुक्यात विक्रमी उत्पादन घेणारे टाकरखेड हे गाव असून येथील शेतकरी दर्जेदार कापसाचे उत्पादन घेतात. या गावाच्या नावावरच कापसाला प्रति क्विंटल १०० ते २०० रुपये भाव जास्तीचा मिळतो. त्याला कारणही तसेच आहे. येथील जमीन ही काळी कसदार असून येथील काही शेतकरी तर कृषी तज्ञानाही लाजवतील असे अनुभवातून तज्ज्ञ झाले आहेत. कंपनीकडून तयार झालेले शेतीविषयक कोणतेही प्रॉडक्ट पहिले या गावात येते. खर्चाचे व उत्पादनाचे गणित मांडून येथे शेती केल्या जात असली तरी दिवसेंदिवस निसर्गाचे लहरीपणामुळे येथील शेतकऱ्यांनाही शेती परवडणारी ठरत नाही.

रासायनिक कीटकनाशक कम्पन्याच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे नेमके कोणते किटकनाशक फवारावे याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यातच कृषिकेंद्रधारक त्यांना अधिक नफा मिळतो तीच डुप्लिकेट औषधी शेतकऱ्यांच्या मस्तकी सद्या मारत आहे. एकंदरीत या भागातील शेतकऱ्यांचे कपाशी हे पीक लाल्यासदृश रोगाने ग्रासले आहे. यासाठी संबंधित विभागाने या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.