साहित्य संमेलनाच्या प्रस्ताव विवेकानंद आश्रमाकडून मागे 

साहित्य संमेलनाच्या प्रस्ताव विवेकानंद आश्रमाकडून मागे 

हिवरा आश्रम, (बुलडाणा) - ""अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्‍यशक्तींना वाटते त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. या बदनामीमुळे ज्यांचे हात संमेलन यशस्वी होण्यासाठी राबणार होते, त्यांच्यात नाराजीची तीव्र भावना निर्माण झाली आहे. असे असेल तर संमेलन आयोजनाचा हेतूच साध्य होणार नाही, यासाठी 91 वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी आम्ही अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत आहोत,'' अशी महत्त्वपूर्ण घोषणा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत केली. 

आर. बी. मालपाणी म्हणाले, ""मराठी साहित्य संमेलनाच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात संमेलन होत असल्याचा आनंद सर्वांना झाला होता. खेड्यापाड्यातील, वाडी-वस्त्यांतील मुलांच्या हातात पाटी-पुस्तक देण्याचे कार्य करणारे, दीनदु-खितांना हृदयाशी धरून त्यांच्यावर उपचार करणारे, जातीपातीच्या भिंतीपाडून नवचैतन्याचे वारे पिऊन संकटाशी चार हात करण्याचे बळ देणारे विवेकानंद आश्रम हे समाजाचे ऊर्जाकेंद्र आहे. आम्ही "मानवसेवा हीच ईश्वरसेवा' या उद्दिष्टांशी सदैव एकनिष्ठ आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार होते. परंतु हे संमेलन कायम संस्थानिकांचेच बटिक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, समर्पणाची संस्कृती संमेलनाच्या आयोजनस्थळात अडचण ठरत आहे. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल, तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत.'' 

""विवेकानंद विचार साहित्य संमेलन स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित करणार असल्याची घोषणाही मालपाणी यांनी या वेळी केली. 

आता तरी वाद थांबवावेत! 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्‍याम मानव व त्यांचे सहकारी करत असलेले आरोप, या आरोपांना विवेकानंद आश्रमाचे प्रवक्ते देत असलेले प्रत्युत्तर आणि त्यात साहित्यिकांचे निर्माण झालेले दोन गट व त्यांच्याकडून येणारी वक्तव्ये यामुळे युगप्रर्वतक स्वामी विवेकानंद यांचीच प्रतिमा खराब होत आहे, तेव्हा विवेकानंद आश्रमानेच हे संमेलन नाकारावे, असा सल्ला 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दिला होता. शिवाय, संमेलनस्थळाची घोषणा केली तरी तसे अधिकृत पत्र देण्यात साहित्य महामंडळाकडून टाळाटाळ सुरू होती. दुसरीकडे, श्‍याम मानव व त्यांचे सहकारी शुकदास महाराज यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवीत होते. अशा त्रिशंकू परिस्थितीत विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाच्या तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या बैठकीत हे संमेलनच नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर बाहेर आलेल्या अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी आता तरी वाद थांबवावेत, असे हताश उद्‌गार काढले. 

""आम्ही संमेलन घेण्यास अपात्र आहोत, असे पत्र दिल्ली येथील आयोजक संस्थेने आम्हाला पाठवले. तसे पत्र अद्याप हिवरा आश्रमाने आम्हाला अधिकृतपणे पाठवलेले नाही. ते पत्र आल्यानंतर साहित्य महामंडळ "आता पुढे काय' याबाबत योग्य तो निर्णय घेईल.'' 
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (अध्यक्ष, साहित्य महामंडळ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com