जट्रोफाच्या बिया खाल्ल्याने सात बालकांना विषबाधा

विरेंद्रसिंग राजपूत
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

या मंदिराशेजारीच जट्रोफाची काही झाडे आहेत. १२वर्षांआतील या बालकांना ही झाडे विषारी असतात याबाबत कल्पना नव्हती. त्यांनी या झाडाच्या बिया दुपारनंतर खाल्ल्यावर यातील ७ जणांना उलट्या व जुलाबचा त्रास जाणवू लागला.

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावशेजारी असलेल्या जट्रोफा या झाडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली.

या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे, की आज स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी गावाजवळीलच महादेवाच्या मंदिराजवळ सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

या मंदिराशेजारीच जट्रोफाची काही झाडे आहेत. १२वर्षांआतील या बालकांना ही झाडे विषारी असतात याबाबत कल्पना नव्हती. त्यांनी या झाडाच्या बिया दुपारनंतर खाल्ल्यावर यातील ७ जणांना उलट्या व जुलाबचा त्रास जाणवू लागला. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यानंतर जट्रोफा या झाडाच्या बिया खाल्ल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांना ताबडतोब जवळच असलेल्या मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सातही विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.