बुलडाणा: दारूबंदीसाठी महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर

आशिष ठाकरे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात दारुबंदी करण्यासाठी नेहमीच आग्रही असून यासाठी वेळप्रसंगी आक्रमक आंदोलन करण्याची गरज पडल्यास तीही करण्याची महिलांची तयारी आहे. परंतू हा लढा तडीस गेल्याशिवाय थांबणार नाही.
- प्रेमलता सोनुने, अध्यक्ष, अस्तित्व महिला फाऊंडेशन, बुलडाणा

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या बंसीलाल नगर मार्गावरील सुरु करण्यात आलेल्या दारु दुकानाला हटविण्यासाठी ऐन हरतालीकेच्या दिवशी दारुबंदीच्या प्रणेत्या प्रेमलता सोनुने यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी दारु दुकान बंद करण्याची मागणी करत तब्बल सहा तास ठिय्या देत हे आंदोलन केले. यानंतर उपविभागीय विभागीय कार्यालयातच हरतालीका पुजा अर्चा केली. सदर आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी आज (ता.28) सदर आंदोलनकर्त्या महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून चर्चा प्रारंभ केली आहे. 

अस्तित्व महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेमलता सोनुने यांच्या नेतृत्वात मलकापूर ग्रामीण गा्रमपंचायतीत सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी दारुबंदीच्या मागणीला घेवून महिलांचा मोर्चा सभेवर धडकला. दारुच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी असा सवाल यावेळी केल्यानंतर प्रशासनाने हात झटकत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर परवानगी दिल्याचे घोंगडे झटकले. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांनी प्रेमलता सोनुने व सरपंच विद्या वराडे यांच्या सह उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. 12.30 वाजेपासून संध्याकाळ पर्यंत ठिय्या आंदोलन केल्यानंतर ऐन हरतालीकेचा सण असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. यानंतर आंदोलनास्थळीच महिलांच्या वतीने हरतालीकेची पुजा मांडण्यात आली होती.

या आंदोलनाची दखल घेत संध्याकाळी उपविभागीय अधिकारी सुनिल विंचरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान आज 28 ऑगस्टला आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी महिलांना चर्चेसाठी आमंत्रीत केले. दुपारी 12 वाजेदरम्यान सदर बैठक सुरु झाली असून निर्णयात्मक तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे यावेळी महिलांनी बोलून दाखविले. यावेळी मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात दारुबंदी करण्यासाठी नेहमीच आग्रही असून यासाठी वेळप्रसंगी आक्रमक आंदोलन करण्याची गरज पडल्यास तीही करण्याची महिलांची तयारी आहे. परंतू हा लढा तडीस गेल्याशिवाय थांबणार नाही.
- प्रेमलता सोनुने, अध्यक्ष, अस्तित्व महिला फाऊंडेशन, बुलडाणा

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Buldhana news women agitation against liquor shop