कर्जमाफीविरोधात कॉंग्रेसच्या आंदोलनास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

बुलडाणा - राज्य सरकारने केलेली कर्जमाफी अत्यंत क्‍लिष्ट आणि फसवी आहे. त्यामुळे या कर्जमाफीविरोधात कॉंग्रेसने बुलडाण्यातून एल्गार पुकारला आहे. "माझी कर्जमाफी झाली नाही' अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले जाणार आहेत. ते तहसीलदार, जिल्हाधिकारी व अधिवेशनामध्ये सरकारसमोर मांडून त्यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करणार आहे. या आंदोलनाचा प्रारंभ बुलडाण्यातून बुधवारी झाला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

चव्हाण म्हणाले, 'केवळ विरोधी पक्ष व शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकले आणि कर्जमाफी केली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवला; परंतु त्यांनी संवेदनाहीन आणि भावनाहिन पद्धतीने अत्यंत कमी लोकांना लाभ मिळेल या पद्धतीची कर्जमाफी केली. 34 हजार कोटी सांगितले जात असले तरी पाच हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे "राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला' अशी गत सर्वांची झाली आहे.