कर्करोगग्रस्त आईने दिव्यांग मुलीसह केली आत्महत्या

Kamala-and-Jyoti
Kamala-and-Jyoti

चिखलदरा (अमरावती) - दिव्यांग मुलीचा चेहरा पाहून आयुष्याचे उरले दिवस स्वःहिमतीवर काढण्याची इच्छा घेऊन जगणाऱ्या आईला कर्करोग केव्हा झाला कळलेच नाही. जेव्हा हे कटुसत्य समोर आले, तेव्हा वेळ नव्हती. आपल्यानंतर मुलीचे काय होईल, या चिंतेने ग्रासलेल्या दुर्दैवी आईने मुलीसह स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. देवालाही त्यांची कीव न यावी एवढे दुर्दैव घेऊन जन्माला आलेल्या आईने आधी विष पाजून पोटच्या गोळ्याला स्वतःच्या हाताने विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. हृदयालाही पाझर फुटावा, अशी घटना मेळघाटच्या नागापूर येथे घडली. कमला नारायण जामकर (वय ४०) व ज्योती नारायण जामकर (वय २२) अशी त्या मायलेकीची नावे आहेत. 

कमला जामकर यांचा १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे नावे ज्योती. हिला डोळ्याचा दोष होता. त्यातच ही एका पायाने दिव्यांग होती. घटस्फोटानंतर पतीने दुसरे लग्न केले आणि आपला संसार थाटला. मात्र, कमला दोन मुलांना घेऊन गावातच राहू लागल्या. अठराविश्‍वे दारिद्र्यात आयुष्य काढणाऱ्या कमला यांचा काळाने घात केला. त्यांना रक्‍ताचा कर्करोग असल्याचे काही वर्षापूर्वी निष्पन्न झाले. हे ऐकून कमला यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. मुलीचे काय होईल, मुलाचे काय होईल, या भीतीने त्या अगदीच हादरून गेल्या. परंतु, उपाय नाही.

 मृत्यू एक-एक दिवस समोर येता होता, तसतसा कमलाचा आत्मविश्‍वास ढासळत गेलाय. आपल्यानंतर मुलीचे काय होईल, याची त्यांना जास्त चिंता होती. शेवटी काळजावर दगड ठेवला आणि निर्णय घेतला. बुद्धीला पटणारा नसला तरी एकदाची चिंता मिटणार होती. ना दुःखाला सामोरे जावे लागणार होते, ना दोन वेळच्या जेवणाची चिंता होती. मात्र, हिंमत होत नव्हती. तरीही बळ कवटाळून कमला दोन-चार दिवसांनी उपचारासाठी नागपूरला जाणार होत्या. परंतु, पुन्हा भीतीने डोके वर काढले. आपण गेल्यावर मुलीचे कोण करेल? तसेच एवढा खर्च आपल्याला झेपेल काय? या विवंचनेत त्या होत्या. आर्थिक स्थितीसुद्धा जेमतेम होती. त्यामुळे योग्य ते उपचार घेता येत नव्हते. याचे शल्य त्यांच्या मनात होते. शेवटी घेतलेला निर्णय तडीस नेण्याचा विचार केला. हे टोकाचे पाऊल असल्याचे माहीत असतानाही त्यांनी तो निर्णय घेतला. रविवारी (ता. १६) दुपारी चार वाजताच्या सुमारास नागापूर येथील बुडीत क्षेत्रातील एका विहिरीजवळ कमला मुलीला घेऊन आल्या. त्या ठिकाणी आधी त्यांनी विषारी औषध प्राशन केले, त्यानंतर विहिरीत उडी टाकली आणि एका उद्‌ध्वस्त आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला.

महागड्या उपचाराला घाबरल्या
कमला जामकर यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपचारासाठी प्रयत्न केला. मात्र, या रोगाचा उपचार करण्यासाठी प्रचंड खर्च येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिथे दोनवेळच्या खाण्याची सोय नाही तिथे उपचार काय करणार? या विचाराने अवसान गळाले. त्यातच मुलगी दिव्यांग. यामुळे त्यांच्या शरीरातील उरलेसुरले बळही संपले आणि त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com