करिअरसाठी हरवले कौटुंबिक स्वास्थ्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

शहरांमध्ये एकत्रित कुटुंब शैलीचा-हास झाला आहे. करियरला जास्त महत्त्व दिले गेल्याने समस्या आणखीनच जटील होत आहेत. एकटे राहत असल्यामुळे कुटुंबे संस्कृतीपासून दूर जात आहेत. त्याचा परिणाम सरळ लग्नावर पडतो.
डॉ. शेखर पांडे, ज्येष्ठ विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, नागपूर.

नागपूर -  एमएस्सी, एमबीए शिक्षीत झालेल्या प्रीतीने सॉफ्टवेअर इंजिनीअर अमीतसोबत वयाच्या तिशीत लग्न केले. दोघांनाही गलेलठ्ठ पगार, सर्व सुख सोयी असताना राजा-राणीचा संसार सुरू झाला. मात्र, अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीतच या संसारात आनंदच नाही असे लक्षात आले. मग भांडण, चिडचीड असे प्रकार सुरू झाले. विसंवाद वाढत गेला आणि वर्षभरातच त्यांनी वेगळे होण्याचे ठरवित कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 

ही फक्‍त एका प्रीती आणि अमीतची गोष्ट नाही. तर, करिअरच्या मागे धावणारी अशी हजारो जोडपी लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोसाठी कौंटुबिक न्यायालयात दाखल झाले आहेत.

पॅकेज पाहून लग्न करणाऱ्यांची फसगत
आजकाल मुली आणि त्यांचे पालक मुलाचे शिक्षण, पोस्ट आणि पॅकेज पाहून लग्न करण्यास होकार देतात. मात्र, गलेलठ्‌ट पगार असणाऱ्या मुलाकडे घरासाठी, बायकोसाठी वेळ नसतो याची जाणीव लग्नानंतर झाल्याने, आपला निर्णय चुकल्याचे मुलींच्या लक्षात येते. कामानिमीत्त 18 तास बाहेर राहणाऱ्यांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही विसंवाद वाढतो आणि घटस्फोटाचा अर्ज पाठविला जातो.

घटस्फोटांची कारणे
सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर
एकमेकांना वेळ न देणे
शरीर संबधांना नकार
पुरुष प्रधान मानसिकतेतून पत्नीचा छळ
मूल होऊ देण्यास नकार देणे