खड्ड्यांचे खापर "ड्रेनेज लाइन'वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नागपूर - शहरातील रस्त्यांची तपासणी करणाऱ्या समितीने दुसऱ्या दिवशीही लक्ष्मीनगर झोनमध्ये पाहणी केली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले उंच फुटपाथ तसेच ड्रेनेजच्या अभावामुळे जमा होणाऱ्या पाण्यामुळे खड्डे पडल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला. सदस्य गायब झाल्याने एकाट्या समिती अध्यक्षांनीच अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

नागपूर - शहरातील रस्त्यांची तपासणी करणाऱ्या समितीने दुसऱ्या दिवशीही लक्ष्मीनगर झोनमध्ये पाहणी केली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले उंच फुटपाथ तसेच ड्रेनेजच्या अभावामुळे जमा होणाऱ्या पाण्यामुळे खड्डे पडल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला. सदस्य गायब झाल्याने एकाट्या समिती अध्यक्षांनीच अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

रस्ते तपासणी समितीने लक्ष्मीनगर झोनमधील खामला, आरपीटीएस, टाकळी सिम, विमानतळ, साई मंदिर प्रभागातील रस्त्यांची पाहणी केली. विमानतळ प्रभागातील समर्थनगरी तसेच कन्नमवारनगरात रस्त्यांवरील गिट्टी निघाल्याचे दिसून आले. या रस्त्यांच्या बाजूने ड्रेनेज लाइन नसल्याने पाणी साचल्याने खड्डे झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला. विमानतळ प्रभागातील एका रस्त्यावर दोन मोठे खड्डे आढळून आले. यातील एक खड्डा ओसीडब्ल्यूने केला होता. दुसरा आणखी एक खड्डा उद्यापर्यंत बुजविण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्याला देण्यात आले. टाकळी सिम प्रभागातील लोकसेवानगरातील रस्ता सुस्थितीत, तर खामला प्रभागातील अग्ने ले-आउटमधील रस्त्यावर खोलगट भाग असून तेथे पाणी साचल्याचे आढळून आले. साई मंदिर प्रभागातील अजनी चौक ते अजनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांचा दायित्व कालावधी मेमध्ये संपुष्टात आला. परंतु, या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली आहे. आरपीटीएस प्रभागातील सुरेंद्रनगर रस्त्यांवरील गिट्टी निघाली असून पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याला उतार नसल्याचेही समितीला आढळून आले.

दुसऱ्या दिवशी 12 रस्ते
लक्ष्मीनगर झोनमध्ये 12 रस्त्यांची पाहणी करण्यात आली. गुरुवारी पाहणी केलेल्या आठ रस्त्यांसह एकूण 20 रस्त्यांची आतापर्यंत पाहणी करण्यात आली. या झोनमध्ये गेल्या दोन वर्षांत 55 रस्ते तयार करण्यात आले. हे सर्व रस्ते दायित्व कालावधीत आहेत.

नगरसेवकांना तक्रारीचे आवाहन
परिसरातील रस्त्यांबाबत तक्रारी पाठविण्याबाबत नगरसेवकांनाही पत्र पाठविण्यात आले. नगरसेवकांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या चौकशीसाठी सूचना, तक्रारी कार्यकारी अभियंता एम. एच. तालेवार यांच्याकडे पाठवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनीही पुढे येण्याची गरज
दोन वर्षांत तयार झालेल्या साडेतीनशे रस्त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत कार्यकारी अभियंता एम. एच. तालेवार यांच्याकडे 9823063938 या क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.