सभापतींच्या निवडीसाठी जून महिना उजाडणार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

निवडणूक कार्यक्रमासाठी महापालिकेचे जिल्हा प्रशासनाला पत्र
औरंगाबाद - स्थायी समिती सभापती व पाच विषय समित्यांच्या सभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांकडे पत्र पाठवण्यात आले आहे. सभापतींची निवड या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक कार्यक्रमासाठी महापालिकेचे जिल्हा प्रशासनाला पत्र
औरंगाबाद - स्थायी समिती सभापती व पाच विषय समित्यांच्या सभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांकडे पत्र पाठवण्यात आले आहे. सभापतींची निवड या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने सभापती मोहन मेघावाले यांच्यासह आठ सदस्य निवृत्त झाले; तर शहर विकास आघाडीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (डेमोक्रॅटिक) कैलास गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे एक अशा नऊ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे पाच, एमआयएमचे दोन व भाजप व शहर विकास आघाडीचे प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ नवीन सदस्य निवडण्यात आले आहेत. युतीच्या बोलणीनुसार यंदाचे सभापतिपद हे भाजपच्या वाट्याला असून, भाजपचे राजगौरव वानखेडे, राखी देसरडा, मनीषा मुंडे असे तीन सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत.

स्थायी समिती सदस्यांबरोबरच पाच विषय समित्यांच्या 45 सदस्यांचीही निवड झाली आहे. सभापतींच्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी मिळावा व निवडणूक कार्यक्रम देण्यात यावा, अशा आशयाचे महापालिका प्रशासनातर्फे विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे पत्र देण्यात आले आहे. या महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होईल, अशी शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली आहे.

आघाडीच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार का?
शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले गजानन बारवाल शहर विकास आघाडीतर्फे स्थायी समिती सदस्य झाले आहेत. सभापतिपदासाठी राजगौरव वानखेडे इच्छुक आहेत तर शहर विकास आघाडीतर्फे गजानन बारवाल इच्छुक आहेत. त्यांना नेत्यांनी तसा शब्दही दिला असल्याचे सांगण्यात येते; मात्र महापालिकेत शिवसेनेची भाजपसोबत युती असताना शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देईल का, अशी चर्चा सुरू आहे.

भाजपमध्ये नाराजी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमोद राठोड यांना आधी उपमहापौरपद, नंतर गटनेतेपद देण्यात आले. शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले गजानन बारवाल यांना आता स्थायी समिती सभापतिपद देण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे जुन्या निष्ठावान भाजप नगरसेवकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.