चांदपूर ग्रीनव्हॅलीच्या विकासाला ग्रहण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

चांदपूर : चांदशहावलीच्या दर्ग्यावरून "चांदपूर' असे नाव पडलेल्या या गावावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. 

धार्मिक, नैसर्गिकदृष्ट्या ख्यातीप्राप्त पर्यटनस्थळ असलेले ग्रीनव्हॅली चांदपूर हे गेल्या चार वर्षांपासून विकासाच्या पुन:प्रतीक्षेत आहे. 

चांदपूर : चांदशहावलीच्या दर्ग्यावरून "चांदपूर' असे नाव पडलेल्या या गावावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. 

धार्मिक, नैसर्गिकदृष्ट्या ख्यातीप्राप्त पर्यटनस्थळ असलेले ग्रीनव्हॅली चांदपूर हे गेल्या चार वर्षांपासून विकासाच्या पुन:प्रतीक्षेत आहे. 

यापूर्वी या पर्यटनस्थळाविकास करण्याचे कंत्राट जोगळेकर कंपनीला देण्यात आले होते. त्यांनी या ठिकाणी बरीच विकासकामे केली. पर्यटक तसेच भाविकांचा ओढा या ठिकाणी वाढल्याने स्थानिक नागरिकांना त्यातून चांगला रोजगार प्राप्त झाला. परंतु, हे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर ग्रीनव्हॅलीकडे दुर्लक्ष झाले. पाहिजे तसा विकास न झाल्याने आज या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्या रोडावली आहे. 

सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या टेकडीवर चांदपूरचे हनुमान मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून विदर्भ व मध्य प्रदेशातील भाविक येथे हजेरी लावतात. भव्य जलाशय, टेकट्या, हिरवीगार वनराई पर्यटकांना भुरळ पाडते. चार वर्षांपूर्वी ग्रीनव्हॅली प्रसिद्धीच्या झोतात होती. बोटिंग, हॉटेल्स, निवासाची व्यवस्था यामुळे परिसरातील तीनशे लोकांना रोजगार मिळाला होता. ऑगस्ट 2012 मध्ये कंत्राट संपुष्टात आल्याने त्यांच्यावर बेरोजगारी ओढवली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ग्रीनव्हॅलीचा विकास करण्यासाठी हस्तांतरण करण्यात आले. परंतु, आजतागायत पर्यटनविकासाची कामे सुरू झालेली नाहीत. आतापर्यंत निविदेकरिता अनेकांनी हजेरी लावली; पण कोणालाही "ग्रीन सिग्नल' मिळाला नाही. 

स्थानिकांचा रोजगार गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. गावातील तरुण रोजगाराकरिता दूरच्या शहराकडे धाव घेत आहेत. चांदशाहवलीचा दरगाह, नकट्या हनुमान देवस्थान, ऋषी आश्रम, विस्तीर्ण जलाशय, नयनरम्य देखावे पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावून जातात. मात्र, त्यांना असुविधेमुळे निराश व्हावे लागते. देवस्थान समिती आपल्या पद्धतीने सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, पर्यटनाच्या दृष्टीने त्या तोकड्या पडतात. चार वर्षांपासून बंद अवस्थेत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूरच्या विकासकामाला गती मिळाल्यास पुन्हा विकासाचे पर्व सुरू होईल. हिवाळी अधिवेशनात तरी हा विषय मार्गी लागेल, अशी अपेक्षा स्थानिकांना लागून आहे. 

राजकीय उदासीनता 
हिवाळी अधिवेशन काळात हनुमंताचे दर्शन घेऊन जाणाऱ्या मंत्र्यांनीही पाठ फिरवली आहे. अमिताभ बच्चनसारखे महानायक अभिनेते तसेच मोठे राजकीय नेते चांदपूरच्या हनुमंताचे दर्शन घेऊन गेले. इतकी प्रसिद्धी मिळूनही पर्यटन विकासाला गती मिळाली नाही. जिल्ह्यात नावारूपास आलेल्या या पर्यटनस्थळाच्या माध्यमातून रोजगार व विकासाच्या संधीला स्थानिक नेत्यांनी दुर्लक्षित केले. मोठ्या नेत्यांच्या 
निवडणूक प्रचाराचा नारळ येथे फुटला. पण, पुढे त्यांना या स्थळाचे विस्मरण झाल्याचे दिसते.

Web Title: Chandpur is waiting for development projects to start