चंद्रपूर : भाजपच्या वादळात कॉंग्रेसचे अस्तित्व कायम

प्रमोद काकडे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

भाजपने उमेदवारी नाकारलेले आणि बंडखोरी केलेले तीन अपक्षसुद्धा निवडून आले. त्यांना पुन्हा पक्षात घेत भाजप 33 चे 36 करतील. छोट्या-मोठ्या पक्षांचे अस्तित्व नावापुरतचे शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्याचे राजकारण तुल्यबळ भाजप आणि विस्कटलेल्या कॉंग्रेसभोवतीच फिरेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

चंद्रपूर : एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न फळाला आले. कॉंग्रेसनेही ग्रामीण भागातील वर्चस्व कायम ठेवले. अस्तित्व टिकविण्यासाठी झगडणारी राष्ट्रवादी शून्यावर आली. या सर्व धामधुमीत शिवसेनेच्या विस्ताराचे प्रयत्न भोपळासुद्धा फोडू शकले नाही. मात्र, भाजपच्या वादळातसुद्धा कॉंग्रेसचे अस्तित्व कायम राहिले. जिल्हा परिषदेच्या आजच्या निकालाची ही वैशिष्ट्ये.

चंद्रपूर जिल्ह्यात आजवर भाजप जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्तेत आला नाही. छोट्या-मोठ्या पक्षांचा आधार घेत त्यांना सत्ता मिळवावी लागली. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पक्षाचा जिल्हाभर विस्तार झाला. आमदारांची संख्या चारवर गेली. याच विस्ताराचे प्रतिबिंब आजच्या निकालात दिसले. त्यामुळेच 56 सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपला तब्बल 33 जागांवर विजय मिळाला. या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातून सर्वच्या सर्व दहा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष गटातगटात विभागला आहे. याही परिस्थितीत कॉंग्रेसने जिल्हा परिषदेतील अस्तित्व कायम ठेवले. गतवेळीपेक्षा केवळ एकने त्यांचे संख्याबळ घटले आहे. कोणताही मोठा नेता प्रचाराला आला नसतानाही स्थानिक नेत्यांनी किल्ला लढवीत आजही ग्रामीण भागात कॉंग्रेसचा मतदार बऱ्यापैकी शिल्लक असल्याचे सिद्ध केले. मात्र, भाजपने गाठलेला आकडा कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आत्मविश्‍वास कमी करायला लावणारा आहे. सर्वाधिक नुकसान झाले ते शिवसेनेचे. गतवेळी एकही आमदार नसताना दोन जिल्हा परिषद सदस्य होते. यावेळी आमदार असतानाही एकही सदस्य निवडून आला नाही. सेनेने यावेळी मोठ्या संख्येत उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांच्याही विस्ताराचा प्रयत्न फोल ठरला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वच यावेळी शून्यावर आले. गतवेळी सात जिल्हा परिषद सदस्य होते. पुन्हा हा पक्ष जिल्ह्यात अस्तित्व दाखवू शकेल, अशी परिस्थिती आता राहिली नाही. राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाचा दिवाही विझल्यातच जमा आहे. पंचायत समितीमध्ये दोन उमेदवार निवडून आले, एवढेच त्यांना समाधान. मनसे, बसपचा प्रत्येकी एक सदस्य होता, आता तोही नाही.

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017