पूर्व विदर्भाचा महावितरणला चुना

पूर्व विदर्भाचा महावितरणला चुना

चंद्रपूर - महावितरण कंपनी महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरविते. चोवीस तास वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणला पूर्व विदर्भातील शेकडो ग्राहकांनी चुना लावला आहे. सद्यस्थितीत दीड लाख ग्राहकांकडे ३६ कोटींची थकबाकी आहे. त्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक मंडळात चंद्रपूर-गडचिरोली, भंडार-गोंदिया परिमंडळाचा समावेश होतो. महावितरण ग्राहकांना महानिर्मिती, खासगी आणि केंद्रातील वीज कंपन्यांकडून वीज उपलब्ध करून देते. वेळप्रसंगी वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जादा दराने महावितरण वीज खरेदी करते. महावितरण पारेषण कंपन्यांचे जाळे वापरून वीजपुरवठा करते. पारेषण कंपन्यांकडे वहन आकार भरून ग्राहकांपर्यंत वीज पोहोचताना महावितरणला काही खर्च येतो. इतकी सेवा देत असतानाही शेकडो ग्राहक वीजबिल भरण्यास मागेपुढे बघतात. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख ग्राहकांकडे ३६ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीदारांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे मागील आठवड्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम राबविली. त्यात चंद्रपूर परिमंडळातील ६३ लाखांची थकबाकी असलेल्या १ हजार ५९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. भंडारा परिमंडळातील ५४ लाखांची थकबाकी असलेल्या १ हजार ४३३ ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल झाली. असे असले तरी अजूनही शेकडो ग्राहकांनी बिले अडवून  ठेवली आहेत.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा मिळून तयार झालेल्या परिमंडळात ९० हजार ग्राहकांकडे अनुक्रमे १० कोटी ९६ लाख, ५ कोटी ६४ लाख थकीत आहे. भंडारा आणि गोंदिया परिमंडळात ६ कोटी  ४३ लाख, १२ कोटी ९९ लाख रुपयांचे बिल ग्राहकांनी थकविले आहे.

७०३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
थकबाकीदार विजबिल देण्यास टाळाटाळ करीत असल्याने महावितरण कंपनीनेही ‘बिल नाही तर वीज नाही’ अशी भूमिका घेत शून्य थकबाकी वसुली मंगळवारपासून सुरू केली. अकरा वाजतापासूनच चंद्रपूर-गडचिरोली परिमंडळात या मोहिमेला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत ७०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत पहिल्या िदवशी ७ हजार ६५९ थकबाकी ग्राहकांकडून एक कोटी ३ लाखांची वसुली करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com