डॉक्‍टरच्या कक्षात गजाननला 35 हजारांनी गंडविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

अनोख्या पद्धतीने तीस हजारांची रोख, मोबाईल, घड्याळ लंपास
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये एका दुकानदाराला 35 हजारांनी ठगविण्यात आले. महिला डॉक्‍टरांच्या कक्षात गंडविणारा हा व्यक्ती कोण, याची चौकशी सुरू झाली आहे.

अनोख्या पद्धतीने तीस हजारांची रोख, मोबाईल, घड्याळ लंपास
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये एका दुकानदाराला 35 हजारांनी ठगविण्यात आले. महिला डॉक्‍टरांच्या कक्षात गंडविणारा हा व्यक्ती कोण, याची चौकशी सुरू झाली आहे.

गणेशपेठमधील घाट रोडवर सेफ सन्स इंटरप्राइजेस नावाने इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकान आहे. 4 एप्रिलला सकाळी साडेअकरा वाजता एक अनोळखी युवक दुकानात आला. त्याने मेडिकल हॉस्पिटलमध्ये 6 कुलर खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्याने एक कुलर निवडला. दुकान मालकाने गजानन कापसे (वय 45, लाडीकर ले-आऊट) यांना पैसे घेण्यासाठी सोबत मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले. आरोपीने मेडिकलमध्ये दुकान मालक गजाननला एका डॉक्‍टरच्या कक्षात खुर्चीत बसविले. आरोपी डॉक्‍टरच्या कक्षात गेला. काही वेळानंतर बाहेर आला. डॉक्‍टर साहेबांकडे दोन हजारांची चिल्लर नाही. रामनवमी असल्याने बॅंकेची सुट्टी आहे. जर त्यांच्या दुकानात 30 हजारांची चिल्लर उपलब्ध असेल तर कोणाच्या तरी हाताने मागवून घ्या, असा सल्ला दिला.

दुकानमालक गजानन यांनी मालकाला फोन केला. मालकाने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हाताने पैसे पाठविले. आरोपी पैसे हातात घेऊन पुन्हा डॉक्‍टरच्या कक्षात गेला. लगेच तो बाहेर आला. डॉक्‍टर साहेबांना पैशाचा हिशेब करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. मोबाईलमधील कॅलक्‍युलेटरचा वापर करण्याचे कारण सांगत गजाननजवळचा मोबाईल घेतला. त्यानंतर डॉक्‍टर पैसे मोजत असल्याची बतावणी करीत गजाननला गुंतवून ठेवले. यादरम्यान गजाननच्या हातातील घड्याळाकडे बघून वेळ विचारला. त्याच्या घड्याळाची प्रशंसा केली.

लगेच घड्याळ बघू दे, असे सांगत घड्याळही घेतले आणि पुन्हा आरोपी डॉक्‍टरांच्या कक्षात शिरला. तो बाहेर आलाच नाही. दरम्यान, काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर गजानन बाहेर बसून थकला. डॉक्‍टरचा कक्षात कोणीच नव्हते. घटनेची माहिती मालकाला दिली. चौकशी केली असता मेडिकल प्रशासनातर्फे अशी कोणत्याच प्रकरची खरेदी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. गणेशपेठ पोलिसात तक्रार करण्यात आली.

सीसीटीव्हीतून शोधणार
मेडिकलमध्ये कुलर खरेदीचे कारण सांगून फसवणूक करणारा आरोपी युवक सेफ सन्समध्ये लागलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मेडिकलमध्ये आल्यानंतरही तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस मिळालेल्या छायाचित्राच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: cheating in doctor ward