अडीच वर्षांच्या मुलाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नागपूर - प्रतापनगरात राहणाऱ्या एका व्यक्‍तीकडे मुलीचा विवाह असल्यामुळे पाहुण्यांची रेलचेल होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

नागपूर - प्रतापनगरात राहणाऱ्या एका व्यक्‍तीकडे मुलीचा विवाह असल्यामुळे पाहुण्यांची रेलचेल होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

दरम्यान, लग्नघरातील एक अडीच वर्षांचा मुलगा रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असताना समोरून भरधाव आलेल्या कारने त्याला चिरडले. चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. लग्नातील पाहुण्यांनी घटनास्थळावर घाव घेतली. क्षणार्धांत लग्नाचा उत्साह आणि आनंद यावर विरजण पडले. सोमवारी दुपारी दीड वाजता प्रतापनगरात ही घटना घडली. यथार्थ यशवंत गोल्हर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

यशवंत बालुजी गोल्हर हे कुही तालुक्‍यातील वेलतूर येथील सधन शेतकरी आणि कृषी केंद्र संचालक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना दोन मुले युगेंद्र (वय 5) आणि यथार्थ (अडीच वर्षे) आहेत. त्याचे साळभाऊ प्रतापनगरात राहतात. त्यांची मुलगी रसिका हिचा विवाह असल्यामुळे रविवारी पत्नी व दोन्ही मुलांसह मुक्‍कामी आले.

दीनदयालनगरात लग्नसमारंभ सुरू असतानाच दोन्ही मुले आजोबा नैवरकर यांच्यासोबत कुल्फी खाण्याचा हट्ट करून निघून गेली. तर, यशवंत व त्यांच्या पत्नी आपापल्या कामात व्यस्त होते. यर्थाथला लघुशंका आल्याने तो पळत रस्त्यावरून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, भरधाव काररूपी काळाने त्याच्यावर घाला घातला. चिमुरड्या जिवाच्या छातीवरून दोन्ही चाके गेल्यामुळे रस्त्यावरच रक्‍ताचा सडा सांडला. यथार्थच्या आजोबाच्या डोळ्यासमोर हा भीषण अपघात झाल्यामुळे त्यांच्या जीवात धडकी भरली आणि रस्त्यावरच कोसळले. अपघात झाल्याचे कळताच पाहुण्यांनी गर्दी केली. त्या कारचालकाला थांबवून यथार्थला वडील आणि नातेवाइकांनी शेजारच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. ही बाब तोपर्यंत यथार्थच्या आईला माहीत नव्हती. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आईने फोडला हंबरडा
अडीच वर्षांचा यथार्थ नुकताच निट बोलायला शिकला होता. त्याचे बोबडे बोल सर्वांनाच कर्णमधूर वाटायचे. त्यामुळे लग्नमंडपातील नातेवाइकांमध्ये त्याचेच लाड सुरू होते. मात्र, अनपेक्षित काळाने घाला घालून यथार्थ हिरवल्याची माहिती मिळताच त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. दातखिळी बसून त्या जमिनीवर कोसळल्या. हे दृश्‍य पाहून खाकीत असलेल्या पोलिसांच्याही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या.

Web Title: child death in accident